माझ्या जीवनातील अवलिया
_________________________
*माझ्या जीवनातील अवलिया*🖋️🖋️
सरांची आणि माझी ओळख आमच्या साईसमृद्धी मल्टी पर्पज हाॅलला कार्यक्रमाच्या बुकिंग दरम्यान झाली. पण गेल्या जन्मातले काहीतरी नाते असल्यासारखे सरांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी माझे ऋणानुबंध जुळले आहेत. तसं पहायला गेले तर सरांचं कर्तृत्व इतके महान आहे, की ते शब्दात पण सांगता येणार नाही. सर माझ्या प्रेरणास्थानी आहेत आणि याचा मला खूप अभिमान आहे. ते खूप तत्त्वनिष्ठ आहेत. तत्त्वाशी तडजोड कधीच करत नाहीत. आपल्या कामाचा कधीच डामडौल करत नाहीत. प्रत्येक काम झोकून देऊन करतात. सरांच्या कडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या .जसे इच्छा असेल तर कुठलीच गोष्ट अवघड नसते,तुझा स्वप्नभंग झाला तरी तुझी मुले उदिष्टपूर्ती नक्की करतील, इर्षा करावी पण निखळ करावी, तसेच मी माझा बिझनेस करत असतानी खूप भावनिक होत होते .तर सरांनी एकदा मला सांगितले की व्यापार आणि व्यवसाय करताना भावनांना महत्त्व द्यायचे नाही.
सरांची रहाणी साधी आहे; पण विचारसरणी उच्च आहे. प्रत्येक क्षेत्रात सरांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. जसे शैक्षणिक कामात अग्रेसर आहेत, तसेच सामाजिक कामातही याचं एक उदाहरण म्हणजे आमच्या दिशा अकॅडमी बाचणी येथील शाळेमध्ये अदिवासी मुले शिकत असताना त्या शाळेला दोन लाख रूपयेचे सायन्स लॅब, कम्युटर आणि धान्य रश्मी स्माईल ट्रस्ट मुंबईच्या माध्यमातून सरांच्या सहकार्यने मिळवून दिले.
आपल्या मनात जर परोपकारी ची भावना असतील तर चांगले विचार आपोआप मनात येतात आणि या विचारांना प्रामाणिक भावनेने जपले तर आपण खुप काही समाजासाठी, देशासाठी कार्य करू शकतो.. या भावनेतून मी जे छोटे समाजकार्य करते जसं की बीड, परभणी जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या पालावर जाऊन शिकवण्या घेणे. त्यांच्या महिलांचे संक्रातीला हळदीकुंकू घेऊन फणीगेम्स् घेणे.. आरोग्य शिबिरे घेणे.. हे करण्यासाठी सरांकडून मला प्रेरणा मिळते.।
सरांचे आणि आमचे खूप घरोब्याचे संबंध आहेत.. नोव्हेंबर मध्ये आम्ही शुभमकडे मालवण ला गेलो होतो.. त्यावेळी सरांसोबत सिंधुदुर्ग किल्ला पाहण्याचा योग आला.. सर किल्ल्याची माहिती सांगतांना मी शिवकाळात असल्याचा भास होत होता.. सगळा इतिहास सरांनी जिवंत केला होता.. आणि त्यावेळी ठरवले की सर रिटायर झाल्यावर सरांसोबत सगळे किल्ले पहायला जायचे.
सरांची आई आजारी होत्या आणि त्यांना पहायला सरांच्या जुन्या घरी गेलो होतो. आम्ही दोघे, मॅडम, सरांचे भाऊ सगळे असताना. सरांच्या आईने खडखडीत आवाजात संभा शाळेसनं आला नाही व्हय ग?? हे ऐकून मन भरून आले. आई खूप सिरियस होत्या. त्याच दरम्यान सरांचे इलेक्शन होते.तरी सर शाळेचं टायमिंग सांभाळून खूप मनापासून आईच्या सेवेशी हजर असायचे. म्हणजे अगदी पॅम्पर बदल्यापासुन ते आईंना खाऊ भरवण्यापासून सर मातृसेवेत तत्पर होते. यात मॅडमाचंही सहकार्य मोठं होतं.
सरांकडे विचारांचं भांडार खूप मोठे आहे.. त्यामुळे माझ्या बिझनेसच्या व्यापातून माझ्या बुद्धीला पाॅझिटिव्ह विचारांचं खाद्य मिळावे, म्हणून आर्वजुन मी आणि माझे मिस्टर दर सोमवारी बाजाराच्या निमित्ताने सरांकडे वैचारिक गप्पा मारायला जातो. या गप्पातून सरांच्याकडून पाॅझिटिव्ह वेव्हज् मला मिळतात. सरांच्या विषयी मलाही आदरयुक्त भीती वाटते.. सर जरी वरून कडक स्वभावाचे वाटत असले तर फणसासारखे आहेत सर.. मॅडम आणि सरांच बॉंडिंग जबरदस्त आहे. इतकं मोठे पदक मिळवणारी व्यक्ती मॅडमना, आम्हाला स्वतःच्या हातानी चहा करून देतात. तसेच सुट्टीदिवशी मॅडमना घरकामात मदत करताना.. यातून सरांची स्त्रियांच्या विषयी असणारी समान भावना दिसून येते.. तसेच ज्यावेळी शुभमच्या लग्नाचा विषय चालू होता, त्यावेळी सरांची बाप म्हणून होणारी घालमेल मी जवळून पाहिली आहे. सर प्रत्येक क्षेत्रात आणि नात्यामध्ये नंबर वन च आहेत.
आपण समाजात जगत असताना समाजाचे काहीतरी देणं लागतो. हे माझ्या मनाशी सतत असतं. यातूनच माझ्या आजुबाजूच्या भागामध्ये जी मी वृद्धांचे हाल वनवास पाहते. त्यांचं हाल होऊ नयेत म्हणून. त्यातुनच आपल्या भागात वृद्धाश्रम चालू करावा अशी इच्छा मी श्री संभाजी पाटील सरांना बोलून दाखवली . आणि सरांनी त्याला लगेच अनुमती दिली.. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने नक्की वृद्धाश्रम ऊभे करायचा माझा मानस आहे.
अलीकडे शुभमचं लग्न झाले आहे ;पण सरांनी सुनेला मुलगी सारखं स्वांतत्र्य दिले आहे. स्नेहलचं भाग्यच आहे, की तिला शुभम सारखा कर्तबगार पती मिळाला. मॅडमांसारखी सासू आणि सरांसारखे सासरे मिळाले.
आम्ही मालवणला जाताना दाजीपूरच्या शाळेला भेट दिली.. दाजीपूर सारख्या अतिदुर्गम भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरांनी राबवलेले उपक्रमाची आणि त्यांच्या इथून पाठीमागच्या महान कार्याची पोचपावती म्हणून राष्ट्रीय पुरस्कार सरांना मिळाला. सरांच्या बाबतीत लिहावं तितकं कमीच आहे.
सर आता सेवानिवृत्त होत आहेत. तर सरांना, मॅडमना आरोग्यसंपन्न जीवन लाभू देत.. सरांची शंभरी आमच्या साईसमृध्दी हाॅलला साजरी करण्याच भाग्य आम्हाला लाभू दे. त्यासाठी सरांनी रोज माझ्या सोबत २० किमी सायकलिंगला यावे ही समर्थ चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
अरूणा मगदूम, सामाजिक कार्यकर्त्या, नरतवडे
Comments
Post a Comment