शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य

 *शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य*


          प्राथमिक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित श्री संभाजी पाटील हे शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य आहेत.त्यांनी अलौकिक कामातून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात वेगळा ठसा उमटवला आहे. मराठी व्याकरण, गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांचा प्रचंड अभ्यास असणारे व्यक्तिमत्त्व विद्या मंदिर सावर्डे पाटणकर या शाळेत मला काही काळ सहकारी म्हणून लाभले.


        आपली शाळा नामांकित व्हावी यासाठी पहिल्या दिवसापासूनच त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले.शाळा सुशोभीकरण,वर्गखोल्यांचे नूतनीकरण , शालेय परिसर सुशोभीकरण करण्याची मोहीमच त्यांनी हाती घेतली.या मोहिमेत आम्ही सुद्धा सहभागी होतो.शाळेचे क्रीडांगण दुरूस्ती करण्यासाठी बिद्री सहकारी साखर कारखान्याची मदत घेतली.अशा विविध कामातून शाळेचा नावलौकिक वाढू लागला.


         एक दिवस गावातील एक व्यक्ती दारूच्या नशेत ऑफिसमध्ये आली आणि धिंगाणा घालू लागली.त्या व्यक्तीला संभाजी पाटील यांनी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला;पण तो ऑफिसमधून काही जाईना.शेवटी त्याच्या श्रीमुखात लगावून त्याला बाहेर काढले.शाळेत पुन्हा असा प्रकार घडला नाही.


      या शाळेत माझ्याकडे क्रीडा विभाग होता.रिलेमध्ये सलग तीन वर्षे येथील मुलांनी जिल्हा स्तरावर पहिला, तिसरा क्रमांक पटकावला.याच काळात चौथी व सातवीच्या सोळा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पटकावली.गावातील पंचायत समिती सदस्या मारुती पाटील, शिवाजी चव्हाण, रामचंद्र काशिद, विठ्ठल लुगडे,बबन पाटील या मंडळींच्या सहकार्याने मिरवणूक काढली.राजर्षी शाहू समृद्धी अभियान मध्ये शाळेला प्रथम क्रमांक व २५०००रू रोख बक्षीस मिळाले.संभाजी पाटील यांच्या पदस्पर्शाने आणि कर्तृत्वाने सर्व काही घडत होते.


       संभाजी पाटील यांच्याकडे पहिलीचा वर्ग आल्यावर त्यांनी विना दप्तर मुलांना उत्तम प्रकारे शिकवता येते,हे त्यांनी तालुक्यातील पहिल्या डिजिटल वर्गातून दाखवून दिले.बरीच वर्षे शालेय चार्ज रेंगाळलेला होता.तो त्यांनी आपल्या कौशल्याने पूर्ण करून घेतला.


     शाळेला शंभर टक्के न्याय देऊन श्री संभाजी पाटील यांनी संघटनात्मक पातळीवर भरीव कामगिरी केली आहे.एम आर देसाई शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले होते.त्यानंतर सलग तीन पंचवार्षिक बिनविरोध करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.२०२२ साली निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांनी दोन पावले मागे घेतली;पण विरोधकांनी फसवणुकीचे प्रकार केल्यामुळे निवडणूक लागली.संभाजी पाटील यांच्या विरोधात अनेक गट एकत्र आले होते. 

आमच्या पॅनेलला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.आमचे माझ्यासह तीन उमेदवार निवडून आले.शिक्षकांची शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या तज्ज्ञ संचालकपदी संभाजी पाटील यांची नियुक्ती झाली. ते दाजीपूर येथे होते, त्यावेळी शाळेला शाळेला शिक्षण सहसंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेटी दिल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम घेतला. रश्मीज् स्माईल ट्रस्टच्या माध्यमातून श्री संभाजी पाटील यांनी राधानगरी तालुक्यात सुमारे पंधरा लाख रूपयांचे साहित्य मिळवून दिले.विद्या मंदिर तिटवे शाळेत या साहित्य वाटप कार्यक्रमास आय एस टी ई दिल्ली चे अध्यक्ष डॉ प्रताप देसाई यांनी उपस्थिती लावली होती .


        यापुढेही त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील योगदान सतत चालू राहो हीच अपेक्षा.


            भीमराव रेपे

अध्यक्ष, राधानगरी तालुका शिक्षक संघ.

Comments

Popular posts from this blog

शर्ट पँट घातलेली मुलांची दुसरी आई

तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

संविधान दिन..