गुरूचे स्थान
____________________
*गुरूचे स्थान*🖋️
गुरूचे स्थान हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे असते.जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस शिकत असतो.आपल्याला चांगले घडवण्यासाठी गुरू महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.आईवडील आपले पहिले गुरू असतात;तर शाळेत प्रवेश केल्यानंतर मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम जे करतात, ते आपल्या जीवनातील दुसरे गुरू होय.
आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला खूप महत्त्वाचे स्थान आहे.शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत,तर ते त्यांना व्यावहारिक आणि आध्यात्मिक ज्ञान सुद्धा देतात.असेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित श्री संभाजी पाटील हे सर्वगुणसंपन्न आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले आहेत. ते दयाळू आहेत,प्रेमळ आहेत, कणखर भूमिका घेणारे आहेत आणि आमच्या शाळेचे चैतन्य आहेत. आजच्या जमान्यात अशी व्यक्ती भेटणे अशक्य आहे असे मला वाटते.कारण ते शिकवत असो की मैदानावर खेळ खेळत असो, तरूणांना सुध्दा लाजवेल असा उत्साह त्यांच्या ठिकाणी आहे.
आमचे मुख्याध्यापक सकाळी शाळेत आले,की अगोदर सफाई कशी झाली हे पाहताच.शाळा स्वच्छ,सुंदर असावी यासाठी ते सतत जागृत असतात.क्रीडांगणावर चुकून कचरा दिसला, तर ते स्वतः उचलतात.कोणतेही काम करताना ते कमीपणा मानत नाहीत.परिपाठाच्या वेळी चांगली सफाई करणाऱ्या वर्गाचे कौतुक करतात.
आमचे मुख्याध्यापक सर्व जबाबदाऱ्या सांभाळत इयत्ता सहावी ते आठवी वर्गावर इंग्रजी शिकवतात.त्यांच्यामुळेच आमचा इंग्रजी विषय चांगला झाला आहे.आठवीला विज्ञान शिकवतात.चौथीच्या वर्गावरही शिकवायला जातात.कसं जमतं हे सगळं त्यांना? सर्व मुलांना सतत प्रोत्साहन देतात.सर्वांशी मित्राप्रमाणे वागतात.सर्वांच्यात मिळून मिसळून खेळतात. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला आहे.हे भाग्य सर्वांना लाभत नाही.
आमच्या मुख्याध्यापकांनी मुलांसाठी अनेक पुस्तके लिहिली आहेत.ही पुस्तके संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. पुस्तक आवडल्याबद्दल सरांना कितीतरी फोन येतात.त्यांची पुस्तके आम्ही आवडीने वाचतो आणि आमचे ज्ञान वाढवतो.
आम्ही मुले सरांना कोणत्याही विषयाचे प्रश्न विचारतो.ते कधीच उत्तर द्यायला टाळाटाळ करत नाहीत;कारण त्यांचे उत्तर लगेच तयार असते.मुलांसाठी ते आजही सायंकाळी सहा-सात वाजेपर्यंत थांबतात.अभ्यासिका घेतात.आम्हाला त्यांचा अभिमान वाटतोच;थोरांनाही खूप अभिमान वाटतो.कारण आमचे सर आपल्या कुटुंबापेक्षा शाळेसाठी खूप वेळ देतात.शाळेवर प्रेम करणारे असे मुख्याध्यापक, शिक्षक मिळणे विरळच आहे.
आमचें मुख्याध्यापक आम्हाला ते आमचेच वाटतात. त्यांचा तास सुरू झाला की कधीच संपू नये असे वाटते.तास सुरू झाला की अधूनमधून मजेशीर गोष्टी सांगतात.हसतखेळत शिकवतात.त्यामुळे त्यांच्या तासाला आम्हाला कंटाळा येत नाही.एखादा धडा समजला नाही किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर समजले नाही तर ते पुन्हा समजावून देतात.कंटाळा करत नाहीत.शिक्षण हाच पाटील सरांच्या जीवनाचा ध्यास आहे.शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात ते हिरीरीने भाग घेतात.त्यांचे नेतृत्व आम्हाला खूप आवडते. शिक्षक या शब्दाचा अर्थ असा....
शि......शिक्षण,शिकवण, शीलवान
क्ष... क्षमाशील
ण.....नम्र....
हे सगळे गुण आमच्या पाटील सरांकडे आहेत. किंबहुना त्याहून अधिक.. वर्गात विविध प्रकारची मुले असतात. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शिक्षण ही प्रक्रिया आहे.हेच सारे आमचे मुख्याध्यापक करतात.मुलांचे गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देतात.म्हणूनच मी म्हणते....
जो द्रव्य वाढवतो
तो काळजी घेतो
जो ज्ञान वाढवतो
तो मान वाढवतो
हे कार्य आमचे आदरणीय संभाजी पाटील सरच करू शकतात.
आमचे सर आता निवृत्त होताहेत;परंतु सर जरी शाळेतून, सेवेतून निवृत्त होत असले तरी आमच्या मनातून कधीच निवृत्त होणार नाहीत.जेव्हा जेव्हा मला पुढील आयुष्यात अडचण येईल, तेव्हा तेव्हा मी सरांचे स्मित हास्य आठवेन.त्यामुळे मला खूप बळ मिळेल आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरे जायची शक्ती मिळेल.जेव्हा जेव्हा आम्हाला सरांची गरज पडेल, तेव्हा तेव्हा सर आणि सरांनी दिलेले ज्ञान सदैव आमच्या पाठीशी असेल.माझ्या प्रिय मुख्याध्यापकांसाठी हे काव्य.....
प्रेमाचे शब्द
स्नेहाचा स्पर्श
आपुलकीची नजर
कौतुकाची थाप
सदैव आमची कदर
असे आहेत आमचे गुरुजी.....!
अनुष्का नितीन पाटील
इयत्ता सातवी, विद्या मंदिर तिटवे.
Comments
Post a Comment