आठवणीतले गुरूजी
आठवणीतले गुरुजी....
गुरुजी हा शब्द काळानुसार सर, टीचर या मध्ये बदलेलेला असला तरी आमच्या मनावर तो अनेक अर्थाने प्रतिबिंबित झालेला आहे. हा शब्द म्हणजे आमचा आदर्श, आमची ऊर्जा, आमचा आत्मविश्वास आणि बरच काही. आई वडीलांनी बोलायला, चालायला शिकवल्या नंतर खऱ्या अर्थाने ज्ञानाची ज्ञानज्योत घेऊन आम्हाला मार्गक्रमण करायला शिकवले ते आमचे गुरुजी म्हणजेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री संभाजी गोविंद पाटील (गुरुजी).
आयुष्याला आकार देणारी, योग्य पैलू पाडणारी वर्षे म्हणजेच आपली प्राथमिक शाळेतील वर्षे. अगदी त्याच पहिल्या प्रवासात म्हणजे पहिली ते सातवी (सन १९९०-१९९७) अशी तब्बल सात वर्षे आम्ही गुरूजींकडे शिकलो. गुरुजींचे आमच्या बॅच वर विशेष प्रेम होते. अर्थात याला आम्ही आमचे भाग्य समजतो. घरापेक्षा जास्त वेळ शाळेत असल्यामुळे या सात वर्षात कुटुंबियांपेक्षा जास्त सहवास आम्हाला गुरुजींचा लाभला. शिक्षण, खेळ, राजकारण, समाजकारण या सगळ्याचे बाळकडू आम्हाला लहानपणापासून गुरुजींकडून मिळाले आणि तीच शिदोरी सोबत घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत.
गुरुजींचे अनेक गुण आम्ही अगदी जवळून पहिले. प्रत्येक खेळामध्ये अतिशय आक्रमकपणे सहभाग घेणार एक अष्टपैलू खेळाडू, प्रत्येक कलेमध्ये हिरीरीने भाग घेणारा उत्तम कलाकार, गरीब विद्यार्थ्याना वेळोवेळी मदत करणारा दाता किंवा नुसत्या शैक्षणिक प्रगतीकडे न पाहता मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा हाडाचा शिक्षक. अशा एक ना अनेक गुणांनी गुरुजींनी आमच्यापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला. गणित, भाषा असे विविध विषय आपल्या एका वेगळ्या पद्धतीने शिकवत स्कॉलरशिप, नवोदय, सैनिकस्कूल ई. स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक ‘बाप’ शिक्षक आहे हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
आमच्या वयक्तिक आयुष्यात सुद्धा गुरुजींचे योगदान फार मोठे आहे. अगदी पहिलीपासून त्यांचे आमच्या सर्व बॅच वर असणारे विशेष प्रेम आम्हाला नेहमी आमच्या कुटुंबियांच्या प्रेमाची जाणीव करून देते. कोणतेही यश मिळाल्यावर त्यांची पाठीवर पडणारी थाप किंवा अपयश मिळाल्यावर त्यांनी वाढविलेला आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी अंगामध्ये दहा हत्तींचे बळ देणाऱ्या असतात. गुरुजींच्या मार्गदर्शनाबरोबर त्यांनी वेळोवेळी केलेली शिक्षा सुद्धा खूप काही शिकवून जात असे. येणाऱ्या प्रत्येक संधीच यशात रूपांतर कसे करावे याचे धडेच जणू ते देत असत. अशाप्रकारे कधी ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देणारा कुंभार, कधी शब्दांचे धागे जोडून पुस्तकरूपी वस्त्र विणणारा विणकार तर कधी वेळप्रसंगी घाव घालून उपयुक्त असे हत्यार बनविणारा लोहार अशा विविध रूपात त्यांना पाहण्याचा योग आला. विद्यार्थ्याची बौद्धिक स्थिति पाहून त्याला योग्य गती देण्याच त्यांच कौशल्य अद्भुतच आहे. याच सगळ्याची पोचपावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले. यामध्ये मिळालेला सर्वोच्च असा ‘राष्ट्रपति पुरस्कार’ आम्हा सर्वाना एक वेगळा आनंद देणारा होता.
आज गुरुजींचे अनेक विद्यार्थी शिक्षक, डॉक्टर, इंजीनियर अशा विविध पदावर कार्यरत आहेत. अनेकजन समाजकारण, राजकारण, व्यवसाय ई. क्षेत्रात आपला ठसा उमठवत आहेत. मलाही ५ वर्षे जर्मनी या देशामध्ये संगणक अभियंता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जवळपास युरोपातील आठ देशांना भेट देण्याचा योग आला. अशाप्रकारे आम्ही सर्वजण शेतकरी कुटुंबातील असूनही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुटुंबासमवेत गुरुजींच्या मिळत असलेल्या मार्गदर्शनामुळे आमचा प्रवास सुखकर होतो आहे याचे आम्हाला विशेष समाधान आहे. खरोखरच त्यांचे हे ऋण शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचे आहेत.
गुरुजी, तुम्हाला तुमच्या पूढील वाटचालीस आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेछ्या . तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो याच सदिछ्या.
“Good teacher teaches you
subject lessons,
Great teacher teaches
Life lessons as well.”
शुभेछुक : विद्या मंदिर पंडेवाडी (बॅच १९९०-१९९७)
शब्दांकन : प्रदीप पाटील (IT Professional,Pune)
Comments
Post a Comment