मैत्रीचा ओलावा

 *मैत्रीचा ओलावा*.                     

        एक प्राथमिक शाळेतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेला अध्यापक , इंग्रजीवर प्रभुत्व असलेला हाडाचा पदवीधर शिक्षक , स्कॉलर ते विविध विषयांवर पुस्तकाचे लेखन करणारा उत्कृष्ट लेखक , एम. आर. देसाई पत संस्थेचा संचालक - चेअरमन - एक नेता ते शिक्षक बॅकेचा संचालक ,जिल्हा परिषद आदर्श शिक्षक ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक अशी यशाची उत्तुंग भरारी घेणारा *माझा जिवलग मित्र श्री . संभाजी पाटील* यांच्या सेवा निवृत्ती निमित्त त्यांच्या संबंधातील आठवणींना उजाळा म्हणून थोडं लिहावे वाटले म्हणून ..... 

              श्री.संभाजी पाटील व मी प्राथमिक शाळेपासूनच एकमेकांचे मित्र होतो . माझ्या पेक्षा एक वर्षानी तो पुढच्या वर्गात होता . मला आठवतंय की, सातवीला श्री.सि.धो.पाटील गुरूजी त्यांच्या वर्गावर वर्ग शिक्षक होते . तेव्हा गुरुजीचा  मुलगा यशवंत पाटील व पुतण्या रमेश पाटील हे सुळंबीहून  सावर्डेच्या शाळेत शिकण्यास यायचे; श्री संभाजी पाटील व ही दोन मुले वर्गात हुशार होती . श्री.सि.धो.पाटील सर तिघांच्या हुशारीबद्दल इतर वर्गात नेहमी सांगायचे. त्यांच्या बोलण्याचा कदाचित माझ्यावर सुध्दा प्रभाव पडला असेल. त्यामुळेच श्री.संभाजी पाटील सारखे आपण सुद्धा व्हायचे .असे मनात धरून मी त्याच्या संपर्कात आलो. अभ्यासातील अडचणी विचारणे असे करता - करता आम्ही एकमेकांचे खूपच जिवलग मित्र बनलो . 

              माध्यमिक शाळा गावात नसल्यामुळे आम्ही 8 वी ते 10 वी सोळांकूर हायस्कूल मध्ये शिकलो. इथे सुद्धा 10 वी ला श्री.संभाजी पाटील सरांनी आपला ठसा दाखवला. त्यांच्याच मार्गाने पायावर पाय ठेवून मी सुद्धा हायस्कूल मध्ये चांगली   कामगिरी करू शकलो. ही त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा मला सतत यशदायी ठरली .                     

             पुढे 10 वी नंतर श्री. संभाजी पाटील यांना डी.एड. ला गारगोटीला ॲडमिशन मिळाले. तेव्हा मी 10 वीला होतो. 10 वी परीक्षेला जायच्या अगोदर नवीन कपडे शिवायला टाकायचे म्हणून एके दिवशी मी गारगोटीला गेलो . तेव्हा (दोन) संभाजी पाटील डी.एड् हॉस्टेलमध्ये राहात होते. कपडे शिवायला टाकली . एक दिवस हॉस्टेलमध्ये त्यांच्या सहवासात वस्तीला राहिलो. त्यानंतर मला सुद्धा वाटायला लागले की, आपण सुद्धा 10वी ला चांगली मार्क्स काढून शिक्षक व्हायचे ! आणि पुढे तेच झाले. श्री . संभाजी पाटील सरांना नजरे समोर ठेवून शिक्षक बनलो .                

           श्री.पाटील सरांनी बी. ए. ला ॲडमिशन घेतल्यामुळे त्यांच्याच सल्ल्याने काय करायचे अशी चर्चा झाली . घरातील आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे पुढे शिकायचे नाही असे घरच्या मंडळींची इच्छा होती ; पण आमच्या घरी सांगून मला बी. ए.पर्यंत शिकवायचेच असे घरी येऊन सरांनी सांगितले . प्रश्न होता तो पैशांचा ! ........कमी पडणारे पैसे मी देतो, माझे नंतर द्या असे सांगितल्यावर घरची मंडळी तयार झाली. श्री . संभाजी पाटील सर बी. ए. पहिल्या वर्षी काही तांत्रिक कारणामुळे परीक्षा देऊ शकले नाहीत .त्यामुळे आम्ही दोघे आता एकाच वर्षी बी. ए. ला एकत्र शिकत होतो. त्यामध्ये गावातील सुरेश पाटील,धनाजी मोरे , तानाजी मोरे, सरवडेचे नामदेव पाटील, रघुनाथ पाटील, बिद्रीचे विलास पोवार, आनंदा हळदे असे एकमेकांचे जिवलग मित्र बनत गेलो.                   

               बी. ए. करत असतानाच पाटील सरांना 1986 ला नोकरीचा कॉल आला. मला मात्र त्यांच्या सहवासाशिवाय कॉलेज एकट्यालाच करणेची वेळ आली कारण दोघांचेही   विषय - सोशॅलॉजी व पॉलिटिक्स असे होते ;पण थर्ड इअरला कोणी तरी सांगितले की डी.एड. झालेल्यांनी मराठी घेणे आवश्यक आहे . तेव्हा सेकंड एअरचे दोन व थर्ड इअरचे पेपर एकाच वर्षी सोडवण्याची वेळ आम्हा दोघांवर आली होती . त्या वेळचा एक प्रसंग अजून आठवतो की, आमचे दोघांचे बैठक क्रमांक एकाच खोलीत आले होते. उत्तर पत्रिका हातात येताच आम्ही दोघांनीही पेपर लिहायला सुरुवात केली होती. एका प्रश्नाचे उत्तर लिहून झाल्यावर प्रश्न पत्रिका दिली तेव्हा सुपर वायझरने विचारले की , तुम्ही पेपर अगोदर कसा लिहायला सुरवात केली ? पेपर तर फुटला नाही ना ? मी थोडा घाबरलो पण श्री.संभाजी पाटीलांनी सांगितले, की हा प्रश्न येणार यांची मला खात्री आहे म्हणून मी लिहायला सुरवात केली. हा त्यांचा स्वत : बद्दलचा आत्मविश्वास मला बरच कांही शिकवून गेला.आम्ही दोघांनीही 1987 ला बी. ए. यशस्वीरित्या  पूर्ण केले.1988ला मला नोकरी लागली .       

              पुढे एम. ए. ला सुद्धा ॲडमिशन घेण्यास मला पाटील सरांनी भाग पाडले. ॲडमिशन फॉर्म स्वतः आणून, स्वतःभरून मी चंदगडहून आल्यानंतर सही घेऊन दोघांचे ॲडमिशन घेतले . सोबत श्री. सुरेश पाटील होतेच. मात्र आमचा विषय मराठी व श्री.सुरेश पाटील यांचा हिंदी एवढाच फरक होता . आम्ही तिघांनी चर्चात्मक अभ्यासावर भर दिला . तिघेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. तिघांची मैत्री चांगलीच झाली होती . काहीही करायचे असेल तर एकमेकांमध्ये चर्चा करूनच आम्ही निर्णय घेत होतो. अशातच तिघांनीही बी. एड्. पूर्ण केले. मी एम. एड् . करण्यासाठी श्री. संभाजी व श्री. सुरेश पाटील यांनी भरपूर प्रयत्न केले ;पण मी मात्र माझी इच्छा नसल्यामुळे ते करू शकलो नाही. माझे दोन्ही मित्र एम. एड्. झाले याचा मला अभिमान आहे ;पण मी त्याच्या बरोबर एम. एड्. करू शकलो नाही म्हणून ते मात्र निश्चितच नाराज झाले असतील . कारण बी. ए . पासून ते बी. एड् . पर्यत शिक्षणाच्या प्रवाहात आपल्या बरोबर घेऊन जाणारा माझा मित्र म्हणजे मला मार्गदर्शक , प्रेरणा, प्रोत्साहन देणारा असल्यामुळेच मी हा प्रवास पूर्ण करू शकलो.                

           हे झाले आमच्या शैक्षणिक वाटचालीचे पण पुढे नोकरीच्या काळात आम्ही शाळेतील उपक्रम , शालेय कामकाजातील चर्चा नेहमीच एकत्र येवून करत असू . त्यामध्ये शाळेत काय करता येईल , काय केले पाहिजे याची वैचारिक चर्चा नेहमीच आमच्यामध्ये घडायची. शिष्यवृतीचा पहिला कित्ता मी श्री . संभाजी पाटील सरांच्याकडून गिरवला. माझ्याकडे जेव्हा शिष्यवृतीचा वर्ग येईल तेव्हा मी त्यांना मार्गदर्शनासाठी बोलावत असे व ते काय शिकवतात ? कसे शिकवतात ? हे मागे बसून निरीक्षण करत असे. त्यांच्या मराठी - गणितावरील प्रभुत्वामुळे विद्यार्थ्यांबरोबर मी सुद्धा माझे ज्ञान वाढवत होतो. तेव्हा शिष्यवृत्तीत तरबेज असलेले श्री.सी.एन. पाटील सर , श्री.शशिकुमार पाटील सर, एम.डी. पाटील सर ( मोघर्डे ) ,एस. डी. पाटील सर ( मांगोली) अशा दिग्गजांच्या सहवासात संभाजी पाटील यांच्यामुळेच आलो आणि मी सुद्धा शिष्यवृत्तीचा चांगला मार्गदर्शक शिक्षक बनलो . श्री संभाजी पाटील सरांना मी चंदगडला असताना गट संम्मेलनात शिष्यवृत्ती मार्गदर्शनासाठी बोलावले होते. तेव्हा माझ्या पहिली ते चौथी पर्यतच्या छोट्याशा एक शिक्षकी शाळेत मार्गदर्शनासाठी ते आले आणि त्यांनी राधानगरी पॅटर्न म्हणजे काय ? हे तेथील शिक्षकांना पटवून दिले . तेव्हा चंदगड मधील माझ्या कामाची स्तुती त्यांनी तोंड भरून केली. आपल्या मित्राला त्यावेळी त्यांनी मोठे केले आणि त्याचेच फळ म्हणून काय त्याच वर्षी मला पंचायत समिती चंदगडचा *आदर्श शिक्षक पुरस्कार* मिळाला . आपल्या प्रमाणे मी सुद्धा लेखन करून एक -दोन पुस्तके प्रकाशित करावीत अशी त्यांची खूप इच्छा होती ;पण मी ती पूर्ण करू शकलो नाही . मला लेखनाची प्रेरणा मिळावी म्हणून आपण  लिहीलेल्या नवीन पुस्तकाची एक प्रत मला ते सतत वाचणास देत .मात्र शिष्यवृती , विज्ञान प्रदर्शन , शैक्षणिक साहित्य निर्मिती यामध्ये प्रत्येक वेळी मला प्रोत्साहन - प्रेरणा देण्याचे काम या मित्रानेच केले . तेव्हा त्यांनी व श्री.सी. एन. पाटील सरांनी मला शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरवण्याचा सल्ला दिला .त्यांच्या प्रेरणेतून 2004 मध्ये वि. मं . कुडूत्री येथे असताना 100 शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शन भरवले. त्या प्रसंगी श्री.संभाजी पाटील सरांनी मला एक सल्ला दिला की, *दिलीप, आपण एखादे चांगले काम करतो तेव्हा आपले शत्रू वाढतात. पण तू कोणाकडेही लक्ष न देता काम करत राहिलास तर निश्चितच  तुझ्या कामाचा ठसा दिसून येईल* . हे वाक्य मी नोकरीच्या पूर्ण कालावधीत लक्षात ठेवून माझ्या कामाचे वलय निर्माण केले. शालेय कामाबरोबरच शिष्यवृती , विज्ञान प्रदर्शन , शैक्षणिक साहित्य निर्मिती अशी चौफेर कामगिरी मला आदर्श शिक्षकाच्या उबंरठ्या पर्यंत घेऊन गेली होती .          

          श्री.संभाजी पाटील सरांना त्यावेळी  जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या मनात एक हूरहूर लागून राहिली ,कीआपल्या मित्राला सुद्धा पुरस्कार मिळावा , यासाठी ते मला सतत म्हणायचे, दिलीप तुझे सर्व क्षेत्रात काम चांगले आहे. तुझा सुद्धा प्रस्ताव सादर करूया. त्यांनी माझ्या पुरस्कारासाठी भरपूर प्रयत्न केले . माझ्या पुरस्कारासाठी माझी इच्छा नसताना सुद्धा गावातील सर्व शिक्षकांना घेऊन राजकीय पुढाऱ्यांना माझ्या काम बद्दल माहिती दिली पण ..... व्यर्थ ! मात्र चार वर्षाच्या प्रतिक्षेनंतर 2012 ला मला जि. प . आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि ही सुध्दा त्यांची इच्छा पूर्ण झाली . तेव्हा माझ्या इतकाच त्यांना आनंद झाला होता .             

             एम. आर. देसाई शिक्षक पत संस्थेत पहिल्या पंचवार्षिकला श्री. संभाजी पाटील यांची निवड झाली . दुसर्‍या पंचवार्षिकला श्री. सुरेश पाटील यांची निवड झाली. पण तिसर्‍या पंचवार्षिकला मला संधी मिळेल असे वाटत होते ;पण ती संधी मिळाली नाही .मात्र 2015 च्या निवडणूकीत मी निवडणुकीस उभा राहिलो, तेव्हा मात्र माझ्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. स्वतः प्रचारासाठी उतरले व मला पतसंस्थेत जाणेची संधी प्राप्त करून दिली .                    

              मित्रत्वाचे धागे असे मजबूत होते ,की राजकारणामुळे आमच्यामध्ये कधीही दुरावा आला नाही .मग ते शिक्षकांचे राजकारण असो वा गावातील राजकारण. एकमेकांच्या सुख - दु:खात आजही आम्ही सहकुटूंब सह परिवार एकत्र असतो. माझे डी.एड.चे मित्र हे त्यांचे मित्र आहेत व त्यांचे डी. एड. चे मित्र हे माझे आहेत . त्यामध्ये बिद्रीचे श्री विलास पोवार सर , केळोशीचे श्री एस. एस. पाटील सर. शाहूवाडीचे अशोक पेटकर सर, हातकणंगलेचे माणिक पाडळकर सर , सुरेश पाटील, संभाजी पाटील व मी अशी सात जणांची  मैत्री गेली 30 - 35 वर्षे अखंडितपणे टिकून आहे . 

                     मैत्री घट्ट असेल तरच  मित्राबद्दल हृदयात कळवळा प्राप्त होतो. 2020 चा एक प्रसंग ! मला करोना झाला होता. मी राधानगरी मध्ये ॲडमिट होतो. दोन दिवस मला बोलाताना सुद्धा त्रास होत होता म्हणून  फोन सुद्धा बंद केला होता. तिसऱ्या दिवशी फोन चालू केला घरातील, पाहुण्याचे असे तीन चार फोन येऊन गेले आणि त्यानंतर थोड्या वेळाने श्री.संभाजी पाटलांचा फोन आला , *दिलीप कसा आहेस ? हे कसे काय घडलं ? काळजी घे.* ' असा आवाज आला . मी ठीक आहे असे मोजकेच बोलून फोन ठेवला. मात्र मित्राची ती धीर देणारी तीन वाक्ये त्या क्षणाला मला फार आधाराची ,मोलाची होती . मी फोन ठेवला भिंतीकडे तोंड केले आणि जवळ जवळ 10-15 मिनिटे माझ्या डोळ्यातून एक सारखे घळा घळा अश्रू वाहत होते. ही आहे आमच्या   मैत्रीतील ओला ठेवणारी अश्रूंची कहाणी ! ( आता सुद्धा लेखन करताना डोळ्यातून अश्रु येत होते . )  सत्कार समारंभाच्या भाषणात एवढे  कोणी माझे ऐकून घेतले नसते व एवढे सर्व मुद्दे आठवलेही नसते; पण स्मरणिकेत  लिहीण्याची संधी मिळाली त्यामुळे मी स्वतः ला धन्य समजतो .

           थोडक्यात माझ्या मैत्रीच्या आज पर्यंतच्या काळात  शैक्षणिक , सामाजिक , आर्थिक , राजकीय कार्यात मोलाचे सहकार्य , प्रोत्साहन , प्रेरणा देणारा , प्राथमिक शाळेतील मुलांमध्ये रमणारा , अभ्यासू  , अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेला अध्यापक, पदवीधर अध्यापक, कार्यतत्पर मुख्याध्यापक , लेखक ,जि. प. आदर्श शिक्षक ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक ..अशी यशाची उत्तुंग भरारी घेणाऱ्या माझ्या जिवलग मित्राला सेवानिवृती नंतरचे पुढील उर्वरित जीवन आरोग्यदायी , सुखी , समाधानी जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना ! धन्यवाद !🙏🏻🙏🏻

                       दिलीप कृष्णा चव्हाण 

               मु.पो.सावर्डे पाटणकर, ता. राधानगरी

Comments

  1. मैत्रीत निर्मळता असते.तेथे स्वार्थ नसतो ,...हेच दर्शवणारा हा लेख मला आवडला

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शर्ट पँट घातलेली मुलांची दुसरी आई

तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

संविधान दिन..