आधारवड
________&_________🖋️
*आधारवड*
विद्या मंदिर तिटवे शाळेत मुख्याध्यापक म्हणून झंझावाती कारकीर्द केलेले आणि सेवेच्या अंतिम टप्प्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित श्री संभाजी पाटील यांच्या सेवेची सुरूवात चांदे ता राधानगरी येथून झाली.तेथून ते सोळांकूर,पंडेवाडी, सावर्डे पाटणकर या गावात अध्यापक म्हणून,तर बुजवडे , उंदरवाडी येथे पदवीधर अध्यापक म्हणून काम केले.केंद्र शाळा दाजीपूर येथे पदवीधर अध्यापक तथा केंद्र मुख्याध्यापक अशी दोन्ही पदे सक्षमपणे सांभाळली .तर मुख्याध्यापक म्हणून विद्या मंदिर तिटवे शाळेत पाच वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द यशस्वीपणे पार पाडली. त्यांना या यशस्वी कारकीर्दीत जिल्हा परिषद कोल्हापूर चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला;तर शिक्षकांना मिळणारा भारत सरकारचा सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार २०१६ साली मिळाला.
राधानगरी, भुदरगड,कागल हे तिन्ही तालुके महाराष्ट्रात अग्रस्थानी आहेत.या यशात संभाजी पाटील यांच्यासारख्या कितीतरी शिक्षकांनी योगदान दिले आहे.तसेच संभाजी पाटील यांनी काढलेला 'गरूडझेप' हा सरावसंच माझ्यासह अनेक शिक्षकांना मौलिक मार्गदर्शन करणारा ठरला.अभ्यासपूर्ण व विविधता असलेले प्रश्न पाहून मी अचंबित झालो. त्यांना न पाहताच दूरूनच अभिवादन केले.त्यांच्याविषयी माझ्या मनात प्रचंड आदर निर्माण झाला. त्यांच्याविषयी अधिक माहिती घेतली, तेव्हा माझ्या लक्षात आले की हा माणूस शिष्यवृत्ती क्षेत्रातील 'बाप' माणूस आहे.
एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक गुणवंत, कीर्तिवंत, नीतिवंत शिक्षकांचा सहवास लाभला. त्यांमध्ये मी कागल तालुक्यातील विद्या मंदिर वाळवे येथे काम करत असताना बोरवडे शाळेचे मुख्याध्यापक राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित श्री सी धों पाटील यांच्या कार्याचा खूप मोठा प्रभाव माझ्यावर पडला होता.कालांतराने असे समजले की,श्री संभाजी पाटील यांचे ते गुरूवर्य आहेत.त्यांची अशी इच्छा होती, की आपला एखादा विद्यार्थी राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित व्हावा.पुढे भविष्यात त्यांच्याच आवडत्या विद्यार्थ्यांने श्री संभाजी पाटील यांनी स्वकर्तृत्वाने त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रपती पुरस्काराचा सन्मान पटकावला.या दोन्ही गुरूशिष्यांचे कृपाछत्र मला लाभावे,हे मी माझे मोठे भाग्य समजतो.
विद्या मंदिर तिटवे शाळेच्या यशोगाथेमध्ये श्री संभाजी पाटील सरांचे सर्वस्वी योगदान आहे.१९१८ साली त्यांनी मुख्याध्यापक म्हणून सूत्रे हाती घेतली आणि शेकडो उपक्रमांबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी सहभाग घेऊन शाळेचे नाव तालुक्यात, जिल्ह्यात , राज्यात नावलौकिक केले.त्यांच्या कारकीर्दीत सत्तर विद्यार्थी गुणवत्ताधारक बनले.शाळेला विविध पुरस्कार मिळाले शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांसारख्या अनेक अधिकाऱ्यांनी शाळेला भेटी देऊन शाळेचे भरभरून कौतुक केले.त्यांच्या छत्राखाली काम करत असताना खूप चांगले आणि समाधानकारक अनुभव आले.त्यांच्या वेगाने काम करताना माझी सूद्धा दमछाक व्हायची.कर्तृत्व, नेतृत्व,दातृत्व, शिस्तप्रियपणा, विद्वत्ता, स्वाभिमान, करारीपणा आणि बाणेदारपणा इत्यादी अनेक गुणांनी गुंफन असलेले व्यक्तिमत्त्व जवळून अनुभवता आले. ते कडक शिस्तीचे भोक्ते आहेत.वक्तशीरपणा तर त्यांच्या ठिकाणी असलेला महत्त्वाचा गुण आहे.बहुतेक वेळी सर सर्वाच्या अगोदर येऊन परिपाठापूर्वी एखादा तास घेतातच.दररोज परिपाठाच्या वेळी पूर्ण वेळ हजर राहून मौलिक मार्गदर्शन ठरलेले असते.दिवसभराभध्ये जेवढा वेळ मिळेल,तेवढा अध्यापनासाठी ते देत असत.कमीत कमी चार वर्गावर अध्यापन केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.शिवाय ऑफिसमध्ये सुद्धा त्यांच्या टेबलावर सतत शंका विचारण्यासाठी मुलांचा गराडा पडलेला असायचा.
सायंकाळी मैदानावर मुलांबरोबर स्वतः खेळत मार्गदर्शन चाललेले असायचं . व्हॉलीबॉल,खो-खो, कबड्डी,धावणे,उंच उडी,लाब उडी, थाळी फेक,गोळा फेक अशा कितीतरी खेळात ते मुलांना आणि आम्हाला सुद्धा आव्हान द्यायचे.मला हरवा आणि बक्षीस मिळवा. सायंकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत उशिरा त्यांचे तास सुरू असायचे किंवा अभ्यासिका सुरू असायची.इतका वेळ मुलांना गुंतवून ठेवताना ना त्यांना कंटाळा यायचा, ना मुलांना....! एवढ्यावरच न थांबता आठवीसाठी रात्री आठ ते नऊ ऑनलाईन तास घ्यायचे.मी या तासाला आवर्जून उपस्थित असायचो.इयत्ता आठवीपर्यंतच्या पूर्ण प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत अधिकाधिक वेळ मुलांसाठी आणि शाळेसाठी देणारे माझ्या संपूर्ण सेवेत अशी एकमेवद्वितीय व्यक्ती आहे.मुलांच्या भावविश्वात जाऊन ते अध्यापन करत असतात.त्यांच्या फलकलेखनातूनही बरेच काही शिकण्यासारखे असते.सर अध्यापन करताना आम्हाला सुद्धा कोडे पडते,की सरांचा नेमका आवडता विषय आहे तरी कोणता...!!?? मराठी, व्याकरण, गणित, इंग्रजी,विज्ञान, सामाजिक शास्त्रे या सर्वच विषयांचे ते अभ्यासपूर्ण अध्यापन करताना मी पाहिले आहे.स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन तर त्यांच्या हातचा मळ आहे.
स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी पाचवी व आठवी साठी शिष्यवृत्ती ग्रुप स्थापन करून व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शिक्षकांना पाटील सर मार्गदर्शन करतात.त्यांच्या शंकांचे निरसन करतात.फक्त शाळा हे सरांचे कार्यक्षेत्र नाही;तर तालुका, जिल्हा, राज्यातील शिक्षक सरांच्या मार्गदर्शन मिळण्यासाठी आतुर असतात.अनेक जिल्ह्यांत जाऊन त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.कोरोनासारख्या बिकट परिस्थितीत चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.आपल्या ठिकाणी असलेला ज्ञानाचा स्रोत त्यांनी सतत वाहता ठेवला.हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
आदरणीय संभाजी पाटील सर यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे एक अद्भुत रसायनच आहे.त्यांचे निरनिराळे पैलू उलगडताना क्षणाक्षणाला दिव्यत्वाची प्रचिती येते.एक जिवाभावाचा माणूस म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी , समाजातील सर्वच थरातील लोकांशी अनोखं नातं निर्माण केले आहे.अनेकांच्या अडचणीच्या वेळी ते आधारवड म्हणून राहिलेले आहेत.म्हणूनच त्यांच्याशी मानसकन्या,मानसबंधू जिवलग मित्र,बहिणी अशी अनेक नाती समाजातून निर्माण झाली आहेत.आजी-माजी हुशार, होतकरू,गरजू विद्यार्थ्यांना सरांनी केवळ मार्गदर्शन केलेले नाही;तर सढळ हाताने मदत केली आहे.समाजातील वंचित घटकांना कपडे, वस्तू, शैक्षणिक साहित्याच्या रूपाने त्यांनी खूप काही केले आहे.दाजीपूरसारख्या दुर्गम भागातील मुलांसाठी ते सतत काही ना काही मदत करत असतात.अनोळखी गरजू लोकांना सुद्धा त्यांनी ऑनलाईन मदत केली आहे.,..
रश्मीज् स्माईल ट्रस्टच्या माध्यमातून आदरणीय संभाजी पाटील सरांनी राधानगरी, भुदरगड कागल तालुक्यातील अनेक शाळांना,स्मार्टबोर्ड, संगणक संच, स्कूल बॅग्ज, सॅनिटरी पॅड, लेखन साहित्य, पेंटिंग साहित्य, लॅपटॉप, शैक्षणिक फीस् , अंगणवाड्यांसाठी खेळाचे साहित्य अशी सुमारे वीस लाख रूपयांची मदत मिळवून दिली आहे.रश्मीज् स्माईल ट्रस्टच्या सेक्रेटरी डॉ भावना कुचेरिया आणि सुहास कुचेरिया यांनी खूप मोठं सहकार्य केले आहे.अंकिता गुरव या गरीब विद्यार्थिनीला ड्रेस, लॅपटॉप, घड्याळ,बी ई.सिव्हील इंजिनिअरिंगची सर्व चार वर्षांची सुमारे चार लाख रुपये फीस् सरांनी सरांनी रश्मीज् स्माईल ट्रस्टच्या माध्यमातून मिळवून दिली.दीनबंधू ग्रुपच्या माध्यमातून राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातील अनेक शाळांना सुमारे दोन लाख रूपयांचे खेळाचे व इतर शैक्षणिक साहित्य मिळवून दिले.रश्मीज् स्माईल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व पाटील सरांना लाख लाख धन्यवाद...!
लेखनकला ही पाटील सरांची खासियत आहे.आपले शैक्षणिक कार्य इमानेइतबारे करत त्यांनी फावल्या वेळात विपुल आणि समृद्ध लेखन केले आहे.त्यांनी विविध विषयांवर पंचवीस पुस्तके लिहिली आहेत.अजून सहा पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.लहान मुले ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे युवक,पर्यटक त्यांना नेहमी अनेक वाचकांचे फोन येतात.पत्रे येतात.तर काही जण भेटीची इच्छा बोलून दाखवतात.आपल्याच सहवासात असणारी ही व्यक्तीचे जेव्हा तटस्थ मूल्यमापन करत असते, तेव्हा त्या व्यक्तीचे कितीतरी पैलू उलगडता येतात.मीही तेच काम करण्याचा प्रयत्न करत आहे.लेखकाबरोबरच पाटील सर एक उत्तम वक्ते आहेत.कोणत्याही व्यासपीठावर, कोणत्याही विषयावर आपल्या अमोघ वाणीतून विविध संदर्भ देत श्रोत्यांची मने जिंकून घेतात.त्यांचे व्याख्यान ऐकताना अमृतानुभव चाखल्याचा आनंद श्रोत्यांना मिळतो.
संभाजी पाटील यांच्या विविध कला उलगडणे खरंच कठीण काम आहे.हार्मोनिअम वादन, तबला वादन, बोलक्या भिंतीवर तैलचित्र काढणे, रांगोळीतून व्यक्तिचित्रे साकारणे अशा कितीतरी कला त्यांनी अवगत केल्या आहेत.
शिक्षक संघटना व सहकारी संस्था यामध्ये सुद्धा त्यांचे खूप मोठे योगदान दिले आहे.प्राचार्य एम आर देसाई शिक्षक पतसंस्थेचे ते चेअरमन होते.वीस वर्षे त्यांची या पतसंस्थेवर सत्ता होती.शिक्षकांची शिखर संस्था म्हणजे कोल्हापूर जिल्हा शिक्षक बॅंक ..! या बॅंकेत ते सध्या संचालक पदावर आहेत. आपल्या ज्ञानाचा उपयोग ते नेहमी आपल्या संपर्कात असलेल्या लोकांसाठी, मुलांसाठी करत असतात.
भविष्यात श्री संभाजी पाटील यांनी एखादे सामाजिक सेवा घडेल असे ट्रस्ट स्थापन करावे आणि त्या माध्यमातून समाजसेवा करावी हीच सदिच्छा, तसेच आयुष्यभर त्याग करणाऱ्या वहिनींसाठी वेळ द्यावा आणि कौटुंबिक जीवन आनंदमय, सुखमय करावे.त्यांचे भविष्यातील सर्व संकल्प तडीस जावे हीच मनापासून सदिच्छा.....!!!
जे आर पाटील (कोनवडे)
पदवीधर अध्यापक वि मं तिटवे
Comments
Post a Comment