शिक्षक आमचे आधारस्तंभ

 *शिक्षक आमचे आधारस्तंभ*


       *गुरु हे शिष्याला सदैव ज्ञान देत असतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच एकमेव तळमळ व इच्छा शिक्षकाची असते.सर्व शिक्षक स्वभावाने चांगले असतात.तसेच शिकवण्याची त्यांची धडपड लक्षात राहण्यासारखी असते. प्रत्येक विद्यार्थ्याला कोणते ना कोणते तरी शिक्षक आवडत असतात.माझ्या प्राथमिक शाळेत असेच एक शिक्षक होते. त्यांचे नाव श्री. संभाजी गोविंद पाटील.चहाची जशी वेळीअवेळी आठवण येते, तशीच पाटील सरांची आज नेहमी आठवण येते.*

 *गुरुने दिला ज्ञानरूपी वसा*

 *आम्ही चालवू हा पुढे वारसा..*

*या दोन ओळींमध्येच खरा अर्थ भरला आहे. सरांची शिकवण्याची हातोटी एकदम वेगळी. अवघड गणित अगदी सहजपणे शिकवण्यात त्यांचा हातखंडाच होता. सरांची स्वभाव वैशिष्ट्ये बोलून आणि सांगून न संपणारी आहेत स्वभावाने शांत व मीतभाषी कधी कधी विनोदी पद्धतीने शिकवणारे पाटील सर विद्यार्थ्यांच्याकडून हसत खेळत स्वाध्याय पूर्ण करून घेत बोलण्याची शैली अतिशय सुंदर त्यामुळे ते विद्यार्थी प्रिय झाले.*

    *सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग मोठा होता. गावातील सर्वच उपक्रम कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहायचा. आमचाही सार्वजनिक कार्यातील सहभाग पुढे राहिला,तो सरांच्यामुळेच. शालेय शिक्षणाबरोबर व्यावहारिक चालणे बोलणे व व्यक्तिमत्व विकास यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग राहिलाआपल्या शाळेचा विद्यार्थी सर्व क्षेत्रांमध्ये पुढे राहावा, ही त्यांची भावना असायची.पोहणे, सायकल चालवणे, भाषण करणे, स्वच्छता राखणे, टापटीपपणाने राहणे याकडे त्यांचे लक्ष असायचे.*

    *बुद्धिमत्ता  हा सरांचा आवडीचा विषय. त्यामुळे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये त्यांचे विद्यार्थी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होत.हजारो मुलांना सुशिक्षित आणि साक्षर करण्यामध्ये सरांचा वाटा मोठा आहे. विविध उपक्रमामध्ये ते आम्हाला सहभागी करून घ्यायचे. अभ्यास केला नाही तर प्रसंगी शिक्षाही करायचे. आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात अनेक शिक्षक पाहिले, पण श्री.संभाजी पाटील सरांच्यासारखे मनमिळावू आणि मदत करणारे शिक्षक दुर्मिळच.*

  *सर आज प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. त्यांनी केलेले संस्कार आणि मार्गदर्शन यामुळे आमचे जीवन सुखकर आणि समृद्ध झाले आहे.सरांच्या निवृत्तीच्या निमित्ताने मी त्यांना दीर्घायुष्य चिंतितो.त्यांना शुभेच्छा देतो.*


*श्री.पांडुरंग सखाराम पाटील*

*पंडेवाडी*

Comments

Popular posts from this blog

तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

शर्ट पँट घातलेली मुलांची दुसरी आई

श्रीकृष्ण जन्माष्टमी