माझे अष्टपैलू मुख्याध्यापक

 *माझे अष्टपैलू मुख्याध्यापक*


       *प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याचे आईवडील पहिले गुरू असतात.ते आपल्या मुलांना चांगले संस्कार करून शाळेत पाठवतात.आपले मूल काहीतरी बनावे,या अपेक्षेने आईवडील मुलाला शाळेत पाठवत असतात.;पण जेव्हा हे मूल शाळेत प्रवेश करते तेव्हा ते एका छोट्या जगातून नवीन विश्वात प्रवेश करते.या नवीन विश्वात त्या मुलाच्या आयुष्यात नवनवीन शिक्षक येत असतात.त्यांतील काही निवडक शिक्षकच आपल्या स्मरणात चिरकाल टिकत असतात.असेच एक प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले शिक्षक माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री संभाजी पाटील माझ्या शैक्षणिक प्रवासात आले आणि माझ्या प्रवास सुखाचा समाधानकारक आणि आनंददायी होऊ लागला. श्री संभाजी पाटील हे माझ्या शाळेचे मुख्याध्यापक असून आमच्या वर्गाला इंग्रजी विषय शिकवतात.विशेष म्हणजे या वर्षी ते सेवानिवृत्त होत असून सुद्धा सहावी ते आठवी इंग्रजी,आठवी विज्ञान आणि चौथीच्या वर्गाला सुद्धा इंग्रजी विषय शिकायला जातात ‌.आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माझे favourite teacher आहेत आणि माझे best friend सुद्धा आहेत.*


          *अत्यंत शिस्तप्रिय, तितकेच मनमिळाऊ,प्रेमळ, मैत्रिपूर्ण स्वभावाचे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माझेच काय, आमच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक आहेत.शाळेच्या आवारात पाय टाकला की शाळेच्या संपूर्ण आवाराकडे चौफेर नेत्रकटाक्ष टाकतात आणि शाळा आणि टापटीप आहे का निरखून पाहतात.सारेकाही ठीकठाक असेल तर परिपाठाच्या वेळी मुलांचे भरभरून कौतुक करतात.असे मुख्याध्यापक आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच आहे*


          *माझे प्रिय मुख्याध्यापक आमच्या म्हणजे इयत्ता सातवीच्या वर्गाला इंग्रजी विषय शिकवतात.त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे इंग्रजी विषय अनेक मुलांचा आवडता बनला आहे.प्राथमिक शाळेत बहुतेक ठिकाणी इंग्रजी हा विषय मराठीतून शिकवतात;पण आमचे मुख्याध्यापक इंग्रजी विषय इंग्रजीतून शिकवतात.मुख्याध्यापक असूनही पहिली ते आठवीच्या कोणत्याही वर्गात शिकवण्यासाठी आवडीने जातात.सर्वांना मार्गदर्शन करतात.शाळेची सगळी कामे करत असतात.स्वच्छतागृह सुद्धा साफ करताना त्यांना कधीही कमीपणा वाटला नाही.तीच सवय नकळत आम्हाला सुद्धा जडली.जी मुले अभ्यासात कमजोर आहेत, त्यांच्याकडे अधिक लक्ष देतात. तळागाळातील मुलं शिकावीत म्हणून खूप धडपडतात.*


       *कोरोना काळात तर आमच्या मुख्याध्यापकांनी पालकांच्या संमतीने धाडसाने शाळा सुरू केली.त्यांच्याविरूद्ध तक्रार केली;पण ते डगमगले नाहीत. आमच्या शाळेत त्यांनी एवढे उपक्रम घेतले की आमचे शाळेतील भरभर संपत चालले आहेत असे वाटते.सकाळी लवकर येतात आणि सायंकाळी खूप उशिरा जातात.आम्हीसुद्धा खूप वेळ शाळेतच रेंगाळत असतो.उशिरा थांबण्यासाठी आमच्यात पैजा लागतात.कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतात, त्याप्रमाणे माझे प्रिय गुरुजी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी सतत कार्यरत असतात*.


         *माझे प्रिय मुख्याध्यापक मी शाळेत येण्यापूर्वीच आलेले असतात.त्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.सर्व मुलांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी ते सतत प्रयत्न करतात.माझे गुरूजी अष्टपैलू आहेत,याचा मला अभिमान वाटतो.खेळाच्या ग्राऊंडवर त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो.आमच्याबरोबर अनेक स्पर्धेत ते भाग घेतात.लाठीकाठी चालवतात.शाळेची सगळी online कामे करतात.त्यांना लेखनाची खूप आवड आहे.त्यांची अनेक पुस्तके महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत.वाचनाची सुद्धा त्यांना खूप आवड आहे. त्यांचे स्टेटस आम्ही नेहमी आवडीने वाचतो. माझे प्रिय मुख्याध्यापक नेहमी online कुणाला ना कुणाला मार्गदर्शन करतात.त्यांचे ज्ञानदानाचे आणि समाजसेवेचे कार्य अखंडपणे चालू असते.*


        *माझे प्रिय मुख्याध्यापक केवळ माझ्या शाळेचे मुख्याध्यापक नसून ते एक माझे आणि माझ्या सारख्या अनेक मुलांचे,शिक्षकांचे मोबाईल टिचर आहेत.माझ्याशी शैक्षणिक आणि तात्त्विक वाद घालणारे माझे प्रिय मुख्याध्यापक ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त होत असले तरी ते तेथून पुढच्या माझ्या शैक्षणिक प्रवासात मार्गदर्शक म्हणूनच राहतील..........!*


         *स्वराली समीर पाटील*

      *इयत्ता सातवी, विद्या मंदिर तिटवे*

Comments

  1. आदर्श मुख्याध्यापक - सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

शर्ट पँट घातलेली मुलांची दुसरी आई

श्रीकृष्ण जन्माष्टमी