धनी आता तरी तुम्ही माझं व्हा
________________________
*धनी आता तरी तुम्ही माझं व्हा*
मेणबत्ती जळत असते , तेव्हा प्रकाश पडतो;पण ती जळत असलेली मेणबत्ती कुणाला दिसत नाही.ज्याचं जळतं, त्यालाच कळतं. वयाच्या अठराव्या वर्षी माझं तुमच्याशी लग्न झाले. त्यावेळी मला संसार म्हणजे काय, हे सुद्धा काही कळत नव्हते.
लग्न झाल्यावर आठ दिवसांनी तुम्ही माझ्या जवळ आलात आणि मला म्हणालात,"अगं, तुला एक गोष्ट सांगायचं राहूनच गेलं."मी आतुरतेने पुढं सरसावून उत्सुकतेने विचारले, "काय हो?" "माझं अगोदरच एक लग्न झाले आहे हं.हे माझं दुसरं लग्न!" धनी अगदी सहज बोलून गेले .पण माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं . डोकं जड झालं.काय करावं,हे सुचना.अंग थरथर कापू लागले.तरीही मी धाडस करुन विचारले,"कुणाशी?" तुम्ही म्हणालात," शाळेशी" अशी आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली.
मला माझ्या संपूर्ण आयुष्याची हळूहळू कल्पना आली.एका खडतर प्रवासाची मला जाणीव झाली होती.आता माझं काम केवळ मेणबत्तीसारखं जळत रहाणं एवढंच आहे,हे माझ्या एव्हाना लक्षात आले होते.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केवळ काम आणि काम हे माझ्या आयुष्याचं जणू सूत्र झाले होते. सूर्य उगवला की तुम्हाला शाळेत जायचं वेध लागलेले असायचे आणि सूर्य मावळला तरी तुमचा घरी येण्याच पत्ता नसायचा. रात्री सात आठ वाजता घरी आला की मला किती आनंद व्हायचा! काय सांगू! अपार कष्टाचे क्षण जसं मी हृदयात जपून ठेवले आहेत, तसेच आनंदाचे क्षण सुद्धा!
रविवार आला की मला खूप आनंद व्हायचा.आता दिवसभर माझा नवरा माझ्या सोबत असणार! पण हा आनंद काही वेळच टिकायचा.एक तर तुम्ही शाळेत ज्यादा तास घ्यायला जायचा किंवा पन्नास साठ मुलं घरीच अभ्यासाला बोलवायचे.मग त्यांचा नाष्टा, दुपारचं आमटी भात आलंच.हे सगळं करत असताना माझ्या कपाळावर तसूभरही आठ्या पडत नसायच्या.मलाही तुमच्यासारखीच अथक काम करत राहायचे,याची सवय लागून गेली होती.समिधा म्हणजे काय,ते हळूहळू समजू लागले होते.आणि मी ठरवलं होतं, की समिधा बनूनच आयुष्य घालवायचं,पण हार मानायची नाही.
अशक्य आणि हार हे दोन शब्द तुमच्या शब्दकोशात कधीच सापडले नाहीत.आणि हेच शब्द मीही माझ्या आयुष्यातून पुसून टाकले होते.कधी आजारी पडले, तरी हार मानली नाही.लढत राहायचं, हे तुम्हीच मला शिकवलं. लढतंच राहिले. सकाळी नऊच्या आत तुम्हाला जेवण लागायचं.सायंकाळी सात वाजता पुन्हा जेवण तयार करायला लागायचे. रोजचे दैनंदिन जीवन तुम्ही कधीच बदललं नाही, मग मी का बदलू?
हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले की माझ्या धन्याचा लौकिक तालुक्यात, जिल्ह्यात राज्यात पसरू लागला.मलाही त्याचा अभिमान वाटायचा.तुमची पुस्तक लिहिण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी पहिले पाऊल मी उचलले आहेत.राष्ट्रपती पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची तुमची इच्छा नव्हती,ती मी पूर्ण केली आहे.तुमच्या निर्णयात, पुढच्या पावलात माझाही वाटा आहे,याचा मला अभिमान वाटत आहे.
तुमचे अपार कष्ट आणि कधीही न थकणारी ऊर्जा पाहून मलाही आता हुरूप येऊ लागला.मलाही तशीच ऊर्जा येऊ लागली.ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला,वाण नाही पण गुण लागला.अशीच काहीशी स्थिती माझी झाली होती.
मी सगळं काही सहन करेन,करत आले आहे,पण तुमच्या स्वाभिमानाला ठेच लागता कामा नये,असे माझं मन नेहमी सांगायचे.अखंड सेवेत तुम्ही स्वाभिमानाने जीवन काढले,पण कधीही लाचारी पत्करली नाही.याचाच मला अभिमान होता, म्हणूनच मला समिधा व्हायला आवडलं.
धनी, आता तुम्ही सेवानिवृत्त होत आहात.मलाही सेवानिवृत्त व्हायचं आहे.एक गृहिणी म्हणून सेवानिवृत्त व्हायचं आहे.आता आमची एकच इच्छा आहे की "धनी आता तरी तुम्ही तुमचा महारथ थांबवा आणि येथून पुढचे आयुष्य आमच्या सहवासात घालवा.आम्हाला तुमचा फक्त सहवास हवा आहे.दुसरं काही नको..
तुमचीच सखी
शारदा संभाजी पाटील, (गृहिणी)
Comments
Post a Comment