प्रत्येक गुरुजींनी संभाजी पाटील बनावं
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मा.संभाजी पाटील सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आज प्रकाशित झालेल्या *'प्रेरणास्त्रोत'* या गौरव अंकात प्रकाशित झालेला लेख
_________________________
*प्रत्येक गुरुजीने संभाजी पाटील बनावं !*
✍️ श्री.सचिन देसाई
_________________________
ऐंशीच्या दशकात शिक्षकी पेशात रुजू झालेले हे वंदनीय गुरुG आज 5G च्या जमान्यात निवृत्त होत आहेत. या मागील चार दशकात काळ बदलला, प्रवाह बदलले, जीवन बदलले शिवाय शिक्षण व शिक्षणाच्या पद्धतीही बदलल्या. बदलाची ही क्रांतिमय नांदी घडत असताना सुद्धा बदलाच्या प्रत्येक टप्प्यात काळपरत्वे स्वतःलाही बदलत... प्रसंगी सिद्ध करत यशाच्या अश्वमेघावर अविरत स्वार होऊन दिव्यत्वाची पताका फडकवत ,अखंडितपणे शिक्षणाच्या वाटेवर चाललेली ही घोडदौड या सर्वाचा साक्षीदार असणाऱ्या त्या काळाचा आदेश मानत ,आता मात्र थोडा विसावा घेणार आहे. प्रवासाच्या या अंतिम क्षणी या वाटसरुला मागे वळून एक कटाक्ष टाकताना... या सर्वश्रेष्ठ शिक्षणाच्या मैदानात त्यांच्याच सोनपावलांनी उधळलेला धुरळा पाहताना किती मनस्वी आनंद होत असेल ? किती मनाच्या श्रीमंतीची अनुभुती देत असेल ? याची फक्त आपण कल्पनाच करु शकतो. मात्र हा धुरळा शिक्षण क्रांतीचा होता.... हा धुरळा सर्वसामान्य मुलांच्या असामान्य यशाच्या रंगारंग सोहळ्याचा जणू प्रतिक होता... हा धुरळा रुढ़ीवाद्यांच्या डोळ्यात घुसून डोळे चोळायला लावून काळाप्रमाणे आपली भूमिका कशी निरंतर, प्रयोगशील व काळपरत्वे असायला पाहिजे ? हे डोळसपणे दाखवणारा होता. या अविरत चाललेल्या पावलांची गती आज जरी मंद होणार असली तरी गेली चार दशके कर्तृत्वातून साकारलेली ही उधळण अशीच अनंत चौफेर कार्याच्या स्मृती खुणा म्हणून शाश्वत राहणार यात तीळमात्र शंका नाही. गुरुवर्य संभाजी पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा पाढा आज जगासमोर जाणीवपूर्वक वाचून दाखवावा, पुनः अधोरेखित करावा इतका अस्पष्ट व मर्यादित नक्कीच नाही; म्हणून त्यांनी शिक्षणासाठी अन् या शिक्षणाच्या प्रवासमार्गात भेटलेल्या प्रत्येक चातकसाठी आजवर काय काय केलं ? हे पुनः नव्याने सांगण्यापेक्षा शिक्षणाची आसीम भक्ती असणाऱ्या सगळ्यांनीच शिक्षण क्षेत्रातील 'भीष्माचार्य' म्हणून ओळख निर्माण करत राष्ट्रपती पुरस्कार सारखा सर्वोच्च सन्मानही शिरपेचात प्राप्त करणाऱ्या संभाजी पाटील गुरुजींचे असामान्य जीवनकार्य या समयी आठवूया, आपल्या हृदयात ते साठवूया | शिवाय कृतज्ञेच्या याच जाणिवेतून आणिक आदर्शाच्या नेणिवेतून एक विनंती करत आहे.... पाटील गुरुजींच्या या सुवर्ण भूतकाळातून एक प्रेरणा घेऊया, शिक्षणाच्या उज्वल भविष्यासाठी आपण सारेच संभाजी पाटील बनूया |
पाटील गुरुजींचे जीवनकार्य प्रत्येक शिक्षकासाठी आदर्शवत असेच आहे. एक उत्तम राजा कसा असावा ? हे अभ्यासण्यासाठी जसं शिवचरित्र अभ्यासावे लागतं अगदी तसचं एक आदर्श गुरु कसा असावा ? हे समजून व उमगून घेण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने संभाजी पाटील गुरुजींचे चरित्र अभ्यासणे मला तितकेच महत्त्वाचे वाटते. अगदी स्वानुभवावरुन सांगायचे तर, शिक्षकाच्या भूमिकेचा व विद्यार्थीप्रति गुरुच्या नात्याचा खराखुरा अर्थ आणि प्रत्यक्ष दाखला कुणाकडून मिळाला असेल तर प्राधान्याने संभाजी पाटील गुरुजींच्या जीवनातून. शिक्षकी पेशाच्या नोकरीला सुरवात झाली त्यावेळी 'सकाळ' वृत्तपत्र सदरात आलेली एक कविता दृष्टीस पडली होती. ज्याचे शीर्षक होते.. "गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का ?" या कवितेच्या मध्यवर्ती अर्थाचा शोध आणि बोध घेण्यासाठी मन कित्येक दिवस भटकत होते. साने गुरुजी सारख्या महान व्यक्तींचा आदर्श फक्त ऐकायला आणि वाचायला मिळाला. पण अशा या 'गुरु' भूमिकेचा खरा धडा शिकण्यासाठी अशा आदर्श गुरुमूर्तींचा दाखला आणि प्रत्यक्ष जिवंत अनुभव आसपास शोधावा लागला. असाच एक आदर्श गुरुचरित्राचा अभ्यास करण्याची संधी मिळाली, ती संभाजी पाटील गुरुजींच्या सहवासातून. एक हाडाचा शिक्षक कसा असतो ? एक परिपूर्ण सर्वगुणसंपन्न आदर्श शिक्षक कसा असतो ? या प्रश्नांची उत्तरे पाटील गुरुजींच्या जीवन चरित्रातून मिळाली. मला आजही तो प्रसंग कालच्यासारखा आठवतो. सन 2016 सालची ही गोष्ट असेल, त्यावेळी साताऱ्यातील 'आधार प्रतिष्ठान' या समाजसेवी संस्थेने मला 'शिक्षकरत्न' हा पुरस्कार देऊन गौरवले होते. माझ्या आयुष्यातील हा पहिला पुरस्कार होता यावेळी माझे अभिनंदन करण्यासाठी माझे गुरुवर्य श्री.डी.डी.पाटील (नाधवडेकर) यांनी मला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देत म्हटले ,जे माझ्या आजही चांगले लक्षात आहे, "सचिन भविष्यकाळात तुला अजून खूप मोठे कार्य करायचे आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक मोठे सन्मान मिळवायचे आहेत ! अगदी संभाजी पाटील सर यांच्यासारखं !" एक प्रकारे त्या दिवसापासून मला संभाजी पाटील यांच्या कार्याविषयी कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण झाली. एखाद्या व्यक्तीचा दाखला दिला जातो किंवा एखादी व्यक्ती सर्वोच्च प्रमाण मानली जाते, नक्कीच ही आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कमाई ठरते आणि अशी कमाई फारच लोकांच्या नशिबी येते. अशा लोकांचा आदर्शवादही भाग्यवान लोकांनाच मिळतो.
माझी कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाल्यानंतर पाटील गुरुजींचा सहवास वाढला. एकाच विचाराच्या अनेक धाग्यांनी एक वेगळी जवळीकता वाढत गेली. त्यांच्या विचारातून, त्यांच्या प्रभावातून त्यांच्याविषयी आदर वाढत गेला. त्यांची चांगली ओळख झाल्यापासून या मागील पाच वर्षात असा एकही सप्ताह गेला नसेल वा असा एकही जीवनातील प्रसंग गेला नसेल की, ज्याबद्दल मी त्यांच्याशी हितगुज अगर सल्लामसलत केली नाही. खऱ्या अर्थाने केवळ शिक्षणाचे नाही तर जगण्याचे सार ही त्यांच्या विचारातून समजले. त्यांच्या कृतीतून व प्रभावातूनच शिक्षकाची खरी व्याख्या काय असते ? याचे उत्तर मिळाले. इतकेच काय ! शिक्षक म्हणून आपण कोणती आचारसंहिता जोपासली पाहिजे ? हे देखील उमगले. शिवाय, मला तितकंच अभिमानाने सांगावसं वाटतं की, आज मी जे काही घडलो... जे काही थोडे फार चांगले कार्य हातून घडत असेल. या सर्वामागील प्रयत्न करण्याची एक नवी उमेद मनामध्ये पेटवण्यास व त्यांस प्रज्वलित करण्यामध्ये पाटील गुरुजींचा मोलाचा आशीर्वाद आहे. असे हे शिक्षण क्षेत्रातील चालते बोलते 'ज्ञानपीठ' आम्ही जवळून अभ्यासू शकलो याचा नेहमीच अभिमान वाटतो.
संभाजी पाटील गुरुजी म्हणजे शिक्षण क्षेत्राला लाभलेले जणू देखणे स्वप्नच आहे. असे स्वप्न जे प्रत्येक शिक्षकाने आपल्या डोळ्यात भरुन घेतलं पाहिजे, हृदयात साठवले पाहिजे. त्यांच्या अष्टपैलू गुणांमुळे आदर्श ठरलेला हा 'गुरुमहिमा' कित्येक मुलांच्यासाठी प्रेरणेचा आणि सामर्थ्याचा स्रोत ठरला आहे. या ज्ञानवृक्षाच्या छायेत वाढलेली कित्येक रोपटी बहरत राहिलीत, याचा मनस्वी हेवा वाटतोय. याशिवाय मनात एक प्रश्नही येतो. एकाच व्यक्तीमध्ये इतके सारे गुण कसे काय ठासून भरू शकतात ? ज्यांची वाणी सुंदर..त्याहूनही लेखणी अतिसुंदर.. प्रयोगशीलता संघटन व प्रशासन कौशल्य सारेच कसे असामान्य आणि विलोभनीय ...एक देदीप्यमान कारकीर्द निर्माण करणारे. अगदी सामान्य भाषेत सांगायचे तर, संभाजी पाटील गुरुजी म्हणजे, एक अद्भुत 'रसायन' च आहे. हे रसायन ना कधी शमले...ना कधी थमले...ना कधी यातील ऊर्जेची तीव्रता कमी झाली....ना कधी कमी होईल. याच उच्च कोटी ऊर्जेतून हजारोंच्या हृदयी स्फुल्लिंगे पेटली.. शेकडोजण शिष्यवृत्तीधारक व प्रज्ञावंत म्हणून ओळखली गेली...याच ऊर्जेच्या सानिध्यातून अनेक चिमुकले तारे बोलायला, खेळायला, चमकायला लागली...इतकेच काय ! सुंदर जगायलाही शिकली ! इतके सारे करत असतानाही समाजातील मस्तकांना घडवणारी पुस्तके लिहिण्यासाठी ऊर्जा कधी कमी पडली नाही. शिक्षण क्षेत्रातील हा तेजस्वी तारा आपल्यातून निघून जातोय ही अपरिमित होणारी हानी भरुन निघणारी नक्कीच नसली तरी आपल्या ज्ञानप्रकाशाने कित्येकाच्या जीवनी निर्माण झालेले ज्ञानरुपी कवडसे निरंतर तेजाची दिशा दाखवत राहील, याची खात्री आहे. आपण केलेले हे कार्य नेहमी सर्वांना आशावाद देत राहील याची खात्री आहे.
म्हणूनच आपले कार्य केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षक, संघटक, प्रशासक व लेखक या सर्वांच्यासाठीच दीपस्तंभ प्रमाणे आहे.
आज निवृत्तीच्या वर्षी देखील आपण मुलांचे सोबत मैदानावर धावतानाचा व्हिडिओ पाहिला तर अंगावर खरोखर शहारे येतात, शिवाय मनाला प्रश्न देखील पडतो. इतका सारा उत्साह कुठून येते ? इतकी सारी शक्ती कुठून संचारते ? इतके सारे चैतन्य कसे निर्माण होते ? आपण मुलांचे केवळ गुरुजी नाहीत तर मित्रही बनलात.... इतकच काय ! तर प्रसंगी आई बापही बनलात ! सण असो की सुट्टीचा वार असो, रविवार असो की असा कुठलाही घरगुती महत्त्वाचा कार्यक्रम असो, आपण सार विसरून नेहमीच शाळेची वाट धरलीत. म्हणतात ना, "चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं, उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचेही ओझं नसतं". असे हे ध्येयवेडाने गतिमान झालेले पाय शाळेकडे वळताना बऱ्याच वेळेला ते पाय अनवाणीही असायचे पण देहभान विसरुन काम करणाऱ्या त्या गुरुमाऊलीला पायाला बसणारे चटके ही कधी जाणवले नाहीत. गुरुजी तुम्ही केवळ आपल्या शाळेतील विद्यार्थीच नाही तर अन्य शाळेत शिकणाऱ्या कैक सर्वसामान्य मुलांचा आधारवड होण्याची भाग्य मिळवलेत. आपल्या विश्वासावरती रश्मीज् स्माईल ट्रस्ट मुंबई यांनी लाखो रुपयांची मदत या दूधगंगा आणि वेदगंगा नदीच्या काठावर राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी पाठवली. या उपकाराचे पाईक होण्याची संधी आम्हालाही मिळाली. आमची बशाचामोळा सारखी दुर्गम भागातील शाळा तालुक्यातील पहिली स्मार्ट शाळा बनली. आपला लेखनाचा व्यासंग...सत्याशी केलेला नेहमीचा संग... तत्त्वाशी राखलेली अभेद्य तडजोड व अखेर पर्यंत जपलेला स्वाभिमानी बाणा आपल्या देदीप्यमान कारकिर्दीस वेगळीच किनार लावून जाते. आमच्यासारख्या अनुयायांना चिंतनासाठी आणि आदर्शसाठीही कारण ठरते. गुरुजी, आपण प्रशासकीय दृष्टी जरी निवृत्त होत असला तरी या शिक्षणाच्या प्रवाहातून कधीही निवृत्त होणार नाही. शिक्षण क्षेत्राशी आपली जोडलेली अमूल्य नाळ कधीही तुटणार नाही. आपले मार्गदर्शन नेहमीच सर्वांचे साठी लाभदायक राहणार आहे. सर तुम्ही आज आमच्यातून निवृत्त होत आहे याचे जितके दुःख होते तितकाच या गोष्टीचा आनंद वाटतो की सर भरलेल्या हाताने निघून जाताय. 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे । घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ।' विंदा करंदीकरांच्या या ओळी जर खरोखर सत्यात उतरत असतील तर नक्कीच आम्हा सर्वांना तुमचे ते हात घ्यायला आवडतील. ज्या हाताने या ज्ञानरुपी मंदिरातील देवतारुपी प्रत्येक विद्यार्थी घडवत असताना अनंत संस्कार पुष्पे आपल्या हातून उधळळीत. त्या पवित्र हाती शेष राहिलेला तो सुगंध आमच्याही हाती यावा एवढीच एक माफक अपेक्षा. म्हणूनच मला या क्षणी इतकेच म्हणावेसे वाटते, आज आपल्या छायेत असणारी ही भावी पिढी, उद्याची ही सजीव देश संपत्ती भरभराटीस आणायची असेल... समृद्ध बनवायची असेल...सर्वगुण संपन्न अशी बनवायची असेल तर प्रत्येक शिक्षकात संभाजी पाटील गुरुजी असायला हवेत. प्रत्येक गुरुजीच्या कामातून संभाजी गुरुजी दिसायला हवे. म्हणून आपल्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणी आपणास भावी आयुष्याच्या सुखी संपन्नतेसाठी आरोग्यपूर्णतेसाठी शुभेच्छा तर देतोच, शिवाय माझ्या सर्व शिक्षक मित्रांना यानिमित्ताने विनंती करतो गुरुजींना केवळ तुम्ही शुभेच्छा देऊ नका तर त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन, त्यांच्या कार्याचा वसा घेऊन, त्यांच्या विचाराचे पाईक होऊन आपणही त्यांच्या कार्याचे वारसदार झाले पाहिजे. सरते शेवटी पुन्हा एकदा इतकीच सांगावीशी वाटते,
*या गुरुमाऊलीची चरित्रगाथा सदैव स्मरणात आणा |*
*प्रत्येक गुरुजींनी आता संभाजी पाटील बना |*
आपलाच एक अनुयायी,
सचिन कुंडलिक देसाई
(अध्यापक, वि.मं.बशाचामोळा)
Comments
Post a Comment