आमचे विद्यार्थीप्रिय गुरू

 .......

आमचे विद्यार्थीप्रिय गुरू

...


माझे गुरुवर्य मा.श्री.संभाजीराव पाटील सर नियत वयोमानानुसार ३१ मे २०२३ रोजी आपल्या ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याबद्दल थोडसं........

                   सर २५ जानेवारी १९८६ रोजी विद्या मंदिर चांदे या ठिकाणी माझे गावी हजर झाले. सावर्डे (पाटणकर)ते चांदे अंतर सुमारे २५ किमी मात्र धामोड ते चांदे हा रस्ता अत्यंत खाच खळग्यांचा, धुळीचा.रस्त्याला रहदारी नाही, चांदे राधानगरी तालुक्याचे शेवटचे टोक. त्यामुळे सर सुरूवातीचे काही दिवस कोते या ठिकाणी आपल्या स्नेह्यांच्याकडे राहिले.त्यानंतर त्यांनी आपला मुक्काम धामोड या गावी हलवला.श्री. बाबुराव साबणे यांचे घरी राहून त्यांनी सायकलने धामोड-चांदे हा पाच किमीचा प्रवास शाळेसाठी सुरू केला.मी त्यावेळी इयत्ता पाचवीत

शिकत होतो.पैलवान शरीरयष्टी,पायात गोफ,स्पष्ट धारदार आवाज,प्रमाणित भाषेतील उच्चार असणारे पाटील सर आम्ही तेव्हा बघत होतो.

          इयत्ता पाचवीचे माझे वर्गशिक्षक श्री. सुरेश अणुस्कुरे सर होते. त्यांची शिस्त कडक होती.अभ्यासातील चुका ,अभ्यास न करणे ,पाठांतर यासाठी ते कठोर शिक्षा करायचे. इयत्ता सहावी हा चांदे मध्ये शेवटचा वर्ग होता. पाचवीतून मी सहावीत दाखल झालो. पाटील सर माझे वर्गशिक्षक होते.सर्वच विषय ते मन लावून सखोल स्पष्टीकरणासह शिकवायचे.मात्र त्यांचा इंग्रजी,गणित 


या विषयांवर अधिक जोर असायचा.इंग्रजी शब्द पाठांतर,गणिती उदाहरणे याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. इंग्रजी शब्द पाठांतरासाठी ते रोज शिक्षा करायचे. तरूण रक्त,तळमळीने अध्यापन करत असले ने त्यांच्या आम्हां विद्यार्थ्यांकडून खूप खूप अपेक्षा असायच्या.

    एके दिवशी खूपदा सांगूनही इंग्रजी शब्द पाठ न केलेबद्दल सरांनी सहावीच्या माझ्यासह सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत जाडजूड लाकडी पट्टीने बेदम मारले.जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचे हात सुजले. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी चुपचाप मार खाल्ला.ही घटना घरापर्यंत समजली तर प्रत्येकाचे आईवडील रागारागाने सरांकडे येतील,सरांना काहीतरी वेडेवाकडे बोलतील. असे होऊ नये म्हणून शाळा सुटल्यानंतर आम्ही सहावीचे सर्व विद्यार्थी एकत्र आलो.सर्वानुमते ही घटना,मिळालेला चोप घरी न सांगणेचे ठरले.मात्र अघोरी शिक्षेचा निषेध करायचं पण ठरलं.दुसऱ्या दिवशी एक -दोन भित्रे विद्यार्थी सोडले तर आम्ही १४/ १५ विद्यार्थी शाळेत गेलोच नाही.घरातून शाळेत म्हणून निघालो सर्व, पण पाचपर्यंत तटस्थ ठिकाणी थांबून राहिलो. असे दोन दिवस आमचे निषेध संपावर गेले.झालेल्या घटनेची आम्ही घरी वाच्चता केली नाही. झालं तिसऱ्या दिवशी सरांचे मलाचं प्रथम बोलावणं आलं. म्हणाले, ' शहाणा आहेस ,बोलव सर्वांना.पुन्हा अशी अघोरी  शिक्षा त्यांनी कधीचं केली नाही.सरांच्यावर त्यावेळी आम्हां विद्यार्थ्यांचा अतोनात विश्वास व श्रद्धा होती. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला कोणतेही गालबोट लागू नये ही भावना त्या वयात आमची होती.

          मी सरांचा वर्गातील लाडका विद्यार्थी असलेने मला ते स्वातंत्र्यदिन,प्रजासत्ताक दिनाला लांबलचक भाषण लिहून द्यायचे.त्यांनी दिलेली भाषणे खूप प्रेरणादायी असायची.त्यामुळे मी ती भाषणे मनःपूर्वक पाठ करायचो. गाव सभेमध्ये अगदी सहजपणे सादर करायचो. सर आणि वर्गातील सर्वच विद्यार्थी यांचे ट्युनिंग अत्यंत जुळले होते.सरांच्या मार्गदर्शनावर सर्व विद्यार्थी व ग्रामस्थही खुश होते.

        सहावीतून मी सातवीला सह्याद्री हायस्कूल या ठिकाणी गेलो. पण सरांच्या आठवणीशिवाय एकही दिवस माझा गेला नाही.सरांच्या संपर्कासाठी मन बेचैन झालं. एके दिवशी सरांना धाडस करून पत्र लिहिलं.मनात धाकधूक होती.सर पत्राला उत्तर पाठवतील का? सरांना माझ्यासाठी पत्र लिहिण्यास वेळ असेल का? असे खूप प्रश्न त्या वेळी माझ्या मनाला पडले.पण गुरू शिष्याला विसरले नव्हतेचं मुळी.थोडयाचं दिवसांनी त्यांचे पत्र आले.खूप खूप अत्यानंद झाला मला. मग सुरू झाला अखंडित गुरु-शिष्य पत्रव्यवहार.मी माझ्या अभ्यासातील अडचणी, माझे दैनंदिन जीवन याविषयी त्यांना पत्राद्वारे कळवायचो. सर खंड न पाडता माझ्या प्रत्येक पत्राचे उत्तर द्यायचे. मी त्यांना अशी शेकडो पत्रे लिहिली. त्यांनीही माझ्या प्रत्येक पत्राचे उत्तर दिले.

मी शिक्षक झाल्याचा त्यांना अभिमान वाटला.

       सरांच्या खूप खूप आठवणी मी आजही माझ्या मनात साठवून ठेवल्या आहेत.मी त्यांना माझे मार्गदर्शकचं नव्हे तर परमेश्वर मानतो. या सृष्टीत देव जर असेल तर तो मला सरांच्या रुपात भेटला. असे मी मानतो.

  सरांनी हजारो विद्यार्थी घडवले. शाळेबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, विद्यार्थांबद्दल असणारी तळमळ त्यांना शाळेशिवाय स्वस्थ बसू देत नाही.विद्यार्थ्यांच्या सोबत खेळणे, त्यांच्यात मोकळेपणाने वावरणे, त्यांच्या गुणांची कदर करणे,चूक झाल्यास कठोर शिक्षा करताना योग्य वेळी विद्यार्थ्यांना शाबासकीही द्यायला ते विसरत नाहीत. सरांचे वाचन अफाट आहे.रिकाम्या वेळी ते वाचनात किंवा लेखनात गुंग असतात. सरांनी खूप पुस्तके लिहिली आहेत. संगणक,मोबाईलच्या या युगात त्यांनी लिहिलेली पुस्तके चालू पिढीला योग्य मार्गदर्शन करत आहेत. अशा या ज्ञानतपस्वी माझ्या गुरुला सन २०१८ चा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.माझ्यासह त्यांच्या सर्वचं शिष्यांना अत्यानंद झाला. त्यांनी केलेल्या अविरत सेवेचे फळ त्यांना भारत सरकारने दिले.

          आणखी एक क्षेत्र त्यांना नेहमी खुणावत राहिलं -शिक्षक राजकारण.

सर शिक्षक राजकारणात अजूनही यशस्वी झाले असते, पण त्यांचा पिंड आदर्श शिक्षकाचा असलेने शिक्षक राजकारणात ते फार गुंतले नाहीत.

मात्र ज्यावेळी त्यांनी राजकारणात स्वतःची ताकद अजमावली. त्यावेळी ते यशस्वीही झाले. शिक्षक बँकेत त्यांना काम करणेची संधी मिळाली.

सन २०१० साली प्राचार्य एम.आर.देसाई पतसंस्थेला संचालक म्हणून मला संधी दिली. सरांवर खूप खूप टीका झाली.विद्यार्थ्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्याला संधी डावलली अशी ओरड झाली.काहींनी उपोषणही केलं.पण ते डगमगले नाहीत.२०२२ साली पुन्हा त्यांनी मला सांगितलं,' नाना, तू लढायचसं '.मी त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा बहुमताने यशस्वी झालो.

     सरांकडे स्पष्टवक्तेपणा आहे, टोकाचा आत्मविश्वास आहे. ते चुकीच्या गोष्टी असल्यास परखडपणे कुणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलतात. माझ्या जडणघडणीत माझ्या आईवडिलांइतकाच त्यांचे योगदान आहे.

  सरांनी माझ्यावर जे संस्कार केले आहेत. त्या संस्कारांच्या शिदोरीवर मी जो काही आहे तो आज आहे. त्यामुळे  शेवटी म्हणावे वाटते-' गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा '.

      माझ्या गुरुंना परमेश्वर शतायुष देवो.गोरगरिबांच्या मुलांसाठी असे संभाजीराव पाटील सरांसारखे लाखो

गुरुजी या समाजात घडावेत.

     श्री. नाना माने ,

                     विद्यार्थी.

Comments

Popular posts from this blog

तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

शर्ट पँट घातलेली मुलांची दुसरी आई

श्रीकृष्ण जन्माष्टमी