मला लाभलेलं अनोखं पितृछत्र

 *मला लाभलेलं अनोखं पितृछत्र*


         "काय अंगणवाडी सेविका का ?" आमच्या नात्यातील पहिले वाक्य --- मी हसूनच उत्तर दिले. नाही, प्राथमिक शिक्षिका. मनात विचार आला कोण आहे ही व्यक्ती असे अचानक येऊन मला असे विचारले ते. काही वेळाने उत्तर मिळाले केंद्र शाळा वलवण दाजीपूर मध्ये नवीन शिक्षक हजर झालेत. श्री संभाजी गोविंद पाटील.

 आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. किंवा आपल्या ला हवीहवीशी असणारी सगळीच लोक आपल्या सोबत राहत नाहीत, म्हणून आपण देवावर खूप नाराज असतो, जशी की मी, इयत्ता 6 वी मध्ये असताना माझे वडिल मला सोडून गेले. पण एकत्र कुटुंबपद्धती असल्याने माझे चुलते श्री रामराव विष्णु पोवार यांनी मला ती पोकळी कधी जानवू दिली नाही, पण नियतीला तेही मान्य नव्हते व 19 जानेवारी 2014 साली मध्ये ते पण मला सोडून अचानक गेले. त्यानंतर मी देवावर पुर्णत: रागातच होते. पण देव कधीच कुणावर इतका अन्याय करत नाही. आणि त्याने लगेचच 2015 मध्ये माझ्या आयुष्यात पाठवले ते म्हणजे श्री संभाजी पाटील सर. माझ्या आयुष्यातली पोकळी भरुन काढण्यासाठी.

आपण कोणत्याच व्यक्तीशी करतो म्हणून नाते तयार होऊ शकत नाही, तर त्या व्यक्तीशी आपले काहीतरी बंध असतात म्हणूनच एक सुंदर- नातं जन्म घेत असते, जसे की, आमच्या दोघांच्यामध्ये बाप-लेकीचे नाते कधी आणि कसे तयार झाले आम्हालाच उमगले नाही. आम्ही एकत्र असताना खुप गप्पा मारायचो, मग त्या शैक्षणिक असो किंवा कौटुंबिक, बोलता बोलता मनातल दुःख हलके होत जायचे, मनातला आनंद द्विगुणित कधी व्हायचा आम्हालाच कळायचे नाही, आणि बघता बघता आमचे नाते शाळा, केंद्र, तालुका, भागात सगळीकडे पसरले गेले.


             दाजीपूर केंद्रात असतानाच सरांना २०१८ साली शिक्षकांना मिळणारा सर्वोच्च पुरस्कार मिळाला.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सारं केंद्र आनंदमय झाले. ओलवणच्या ग्रामपंचायतने इतिहासात पहिल्यांदाच कुणाचीतरी सत्कार केला.ते म्हणजे आमचे पितृतुल्य संभाजी पाटील सर.आमचे पूर्ण केंद्रच राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित झाल्यासारखे आम्हाला वाटत होते.


             सर मला नेहमी 'मुला' म्हणून बोलवत. या शब्दानेच मला इतके सुखावून जायचे, की ते शब्दात मांडूच शकत नाही. आमचं नातं काही दिवसांतच इतके घट्ट झाले की, मी त्यांच्याशी हक्काने रागवायची, भांडायची पण ते माझ्यावर कधीच रागावले नाहीत.


             असे म्हटले जाते ,की मोठ्या झाडांखाली छोटी झाडे पूर्ण विकसित होऊ शकत नाहीत; पण हा निसर्गनियमही त्यांनी बदलला. यांची मोठी शाळा आमची द्विशिक्षकी शाळा तरीही आम्ही सर्व कार्यक्रमामध्ये, उपक्रमांमध्ये मी आणि माझी शाळा उत्साहाने सहभागी होऊन साजरे करु लागलो.

खूप कमी लोक असतात, की जी आपल्या सोबत इतरांनाही घेऊन पुढे जातात. जसे की माझे पितृतुल्य संभाजी पाटील सर - ज्यांच्या मुळे आमचे केंद्र एक कुटुंब कधी बनले हे कुणाला कळले नाही. प्रत्येकातला एक सुप्तगुण ओळखून त्याला त्या पद्धतीने काम सोपवून त्यामध्ये अजून वेगळेपणा कसा आणता येईल ,याचे मार्गदर्शन करुन प्रत्येकामध्ये "हम भी किसी से कम नहीं हा आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला.


आमचे केंद्र छोटे आणि दुर्गम असूनही आम्ही कोणत्याच उपक्रमात तेंव्हा मागे पडलो नाही. त्यांच्या असण्यामुळे केंद्रात माझी अशी एक सुरक्षाकवच असलेली जागा निर्माण झाली. त्यांच्या सोबत असण्यामुळे आणि आमच्यात निर्माण झालेल्या नात्यांमुळे  मला एक असा आधारवड मिळाला ,की ज्यामुळे मी दाजीपूर सारख्या दुर्गम भागात नोकरी करत असूनही मला काही त्रास झाला नाही.


           सरांची सेवा निवृत्ती बघता बघता एका महिन्यांवर येउन ठेपली, पण खरं तर अजूनही ते किमान 10 वर्षे तरी निवांत या क्षेत्रातील स्वतः ची जागा जशी आहे तशी पूर्ण न्याय देऊन टिकवून ठेवतील, पण ही एक बाजू झाली शैक्षणिक कार्याची. पण खरं तरं सरांना आता नवीन जॉब मिळालाय..! only family time job. ज्याच्यात त्यांनी 100 % devotion दयायचे आहे. आमच्या काकींच्या हक्काचे जे जे क्षण त्यांना अनुभवता, आनंदता आले नाहीत.ते सगळे त्यांना द्यायचेच. काकींनी सरांचा हा लौकिक होण्यासाठी केलेल्या प्रत्येक त्यागाचे आता त्यांना पूर्णवेळ देऊन भरपाई करायची आहे.


अशा तऱ्हेने शुभम आणि स्नेहलच्या नवीन आयुष्यासोबत आपल्याही नवीन आयुष्याला पुन:श्च सुरुवात करावी हीच सदिच्छा. तसेच आपल्या देशातील अनेक गोष्टीवर लेखन किले. आता परदेश दौरे करुन तेथील संस्कृती , वेगळेपण आपल्या लेखनातून आमच्यापर्यंत पोहचवावे ही अपेक्षा.


            *आपलीच लेक*

                 *सुरेखा*

Comments

Popular posts from this blog

तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

संविधान दिन..

दुबई दर्शन...एक अविस्मरणीय प्रवास