कल्पवृक्ष ..
__________________🖋️
कल्पवृक्ष
आज पहिल्यांदा लिहिण्याचा योग जुळून आला. त्याच कारण म्हणजे पप्पांची सेवानिवृती... अडतीस वर्षांच्या झंझावाती सेवेनंतर माझे पप्पा 31मे 2023रोजी सेवानिवृत्त होत आहेत.एक दिवस पप्पांचे विद्यार्थी घरी आले आणि पप्पांच्या सेवानिवृत्ती निमित्त स्मरणिका प्रकाशित करणार असल्याचे बोलून दाखवले.त्या दिवसापासून माझ्याही मनात नकळत काही तरी लिहावे असे वाटत होते. माझ्या भावना व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न मी करत आहे.
लग्न झाल्यावर मुलगी जेव्हा सासरी येते ,तेव्हा तिच्यासाठी सगळी माणसं ही नवीन असतात. सासू-सासरे यांच्यासोबत जुळवून घेणं, हे सर्व मुलींना थोड कठीण जातं. काही दिवस तरी. पण माझ्याबाबतीत असं काही झालं नाही. सासू-सासऱ्यांच्या रूपात आई-वडीलच मला मिळाले आहेत. सर्व मुलींच्या आयुष्यात वडिलांची जागा ही खूप महत्त्वाची असते. पण निसर्गाच्या कृपेने आणि नशिबाने मला वडीलांसारखं प्रेम करणारे सासरे मिळाले. सून आणि सासरे हे नातं मागे पडून मुलगी आणि वडील असं एक सुंदर आणि मैत्रिपूर्ण नातं आमच्यामध्ये निर्माण झालं. खरं तर त्यांनी मला सुनेची वागणूक अशी कधी दिलीच नाही.
पहिल्यांदा माझे पप्पांसोबत बोलणं झालं, ते फोन वर. पप्पांचा वाढदिवस होता. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. फोन वर बोलताना मनामध्ये थोडी भीती होती. पण फोनवर जसं बोलायला सुरुवात केली तेव्हा भीती कधी नाहीशी झाली, हे मला सुद्धा समजल नाही. शुभमशी बोलताना पप्पां बद्दल खूप काही ऐकलं होतं. पुण्यामध्ये गप्पा मारताना शुभम पप्पां बद्दल खूप काही सांगायचा. पप्पांचा स्वभाव, त्यांची शिकवण्याची पद्धत, त्यांना असणारी लिहिण्याची आवड ....या सर्व गोष्टी प्रभावित करणाऱ्या आहेत. त्यामुळे माझ्या मनात पप्पां विषयी एक वडिलांची जागा आपोआप निर्माण झाली. पप्पांची आणि माझी भेट पहिल्यांदा झाली ती कोल्हापूर मध्येच.मला चांगलं आठवतंय .माझी परीक्षा होती. त्यासाठी मी कोल्हापूरला पहिल्यांदा आले होते. तेव्हा पप्पा मला न्यायला आले होते. पप्पांना भेटल्यावर असं वाटलंच नाही, की आमची भेट पहिल्यांदाच झाली आहे. पप्पांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांच्यासोबत असणारी व्यक्तीसुद्धा तितकीच बिंधास्त होऊन त्यांच्याशी गप्पा मारत असावी, कारण हा अनुभव मला आमच्या पहिल्या भेटीतच आला होता. खरं तर शुभमचे मी आभार मानेन, कारण शुभम माझ्या आयुष्यात आला ,म्हणूनच मला पप्पांसारख्या देवमानसचा सहवास आयुष्यभर लाभणार आहे. आमच्या लग्नामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता त्यांनी पडू दिली नाही. लग्न होण्याच्या अगोदर पासूनच पप्पांचंआणि माझं नातं हे वडील आणि मुलगी असं झालं होतं. त्यामुळे लग्न झाल्यावर मला घरामध्ये मिसळणं सोपं गेलं.
आज प्रत्यक्ष पप्पांच्या सहवासात राहत असल्यामुळे त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी मला माहीत पडत गेल्या. हिरा ज्याप्रमाणे पैलू पाडून घडवला जातो;त्याचप्रमाणे पप्पांनी एक शिक्षक म्हणून हिऱ्यासारखे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी घडवलेल्या आहेत. पप्पांच्या सहवासात वाढलेला प्रत्येक विद्यार्थी आज चांगल्या पदावर कामावर आहे. प्रत्येकजण त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रामध्ये आज नाव कमवत आहे.
क्षक्ष शिक्षक म्हणून पप्पांनी किती मेहनत घेतली असेल, हे मला समजत आहे. कारण बरेच विद्यार्थी आजही पप्पांना भेटायला येतात. पप्पांच्या शिकवण्याची पध्दत किती चांगली होती, हे यावरून समजतं. मला वैयक्तिक पप्पांचा सहवास जरी कमी मिळाला असला तरी, येथून पुढे आयुष्यभर मला त्यांचा सहवास लाभणार आहे. त्यांच्या सहवासात मी बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकेन. खरं तर त्याची सुरुवात झाली आहे. मला चार चाकी गाडी चालवताना भीती वाटायची ;पण ही माझी भीती पप्पांमुळे नाहीशी झाली. पप्पांनी विश्वासाने मला गाडी चालवायला दिली आणि आज मी त्यांच्यामुळेच परफेक्ट गाडी चालवू शकत आहे.. सासरे आणि सून असं जरी आमचं नातं असलं, तरी माझ्यासाठी पप्पा हे एक वडील, मित्र, शिक्षक आणि गुरु आहेत. पप्पांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही उत्साह वाढवणारी असते.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती असते, त्या व्यक्तीबरोबर बोलल्यावर मन मोकळं तर होतच; पण नवीन काही तरी करण्याची ऊर्जा त्यांच्यामुळे मिळते. अशी एक हक्काची व्यक्ती माझ्या आयुष्यात पप्पांच्या रूपाने आली. पप्पांकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कसंअसावं यांचं उत्तम उदाहरण म्हणजे पप्पा. तुमच्या शिक्षकी पेशावर तुम्ही मनापासून प्रेम केलंय. खरं तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात जगलात. आलेला प्रत्येक क्षण चांगला किंवा वाईट कसा जगायचा, हे तुम्ही विध्यार्थ्यांना शिकवलं. प्रत्येकाला कुठे ना कुठे थांबावं लागतं आणि नवीन प्रवासाला सुरुवात करावी लागते. अशाच एका सुंदर प्रवासातून तुम्हाला आता थांबावं लागत आहे. जरी तुम्ही आज सेवानिवृत होत असला तरी, तुमची शिकवण आणि तुमचा काम करण्याचा उत्साह आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत राहील. आयुष्य खूप सुंदर आहे. त्यामुळे आत्ता निवृत्त झाल्यावर खूप फिरा आणि येणारा प्रत्येक क्षण आनंदात घालवा. सासरे हे आपल्यासाठी निसर्गाने पाठवलेले बेस्ट वडील असतात आणि हेच बेस्ट वडील माझ्याकडे सुद्धा आहेत,याचा मला अभिमान आहे.
तुमचीच लाडकी सून
स्नेहल पाटील-वाडकर
Comments
Post a Comment