शिक्षण क्षेत्रातील महामेरू
___________________
*शिक्षण क्षेत्रातील महामेरू*
बोट धरून चालायला शिकवलं तुम्ही! पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही! तुमच्यामुळे आम्ही आज आहे या ठिकाणी !
आज आपले गुरुजी निवृत्त होत आहेत .त्यांच्या कार्याचा इतका मोठा डोंगर आहे, की तो सांगून संपणार नाही. ज्या गुरूकडून ज्ञान मिळवून त्याची कृपादृष्टी मिळवण्यासाठी आम्ही धडपडत होतो ते गुरू म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आमचे चुलते आहेत. त्यामुळे मला लहानपणापासूनच सहवास मिळाला माझ्यासारख्या दगडाला पैलू पाडण्याचे काम त्यांनी केले. गुरुजींनी असे अनेक विद्यार्थी घडविले
अगदी लहानपणापासूनच गुरुजींचे माझ्यावर बारीक लक्ष असायचे .दिवसभर शिकवून शाळेकडून आल्यानंतरही ते कधीही थकलेले दिसत नसायचे. मी चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यावर आमच्या गुरूंनी पेढे वाटून आनंद साजरा केला .असे होते आमचे गुरु शिष्य नाते .माझी निवड पुसेगाव येथील शाळेत झाली होती .ती शाळा आमच्या गुरुजींनी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर पसंत पडली नाही .म्हणून मला तिकडे पाठवले नाही .याचा मला खूप आनंद वाटला ;पण त्यांच्या तालमीत शिकत असताना कधी कधी शिक्षाही मला मिळाली. त्याचा उपयोग पुढे भविष्यात चांगले शिक्षण घेण्यासाठी झाला.
आमचे गुरुजी फक्त रोजच्या शिक्षणावर भर देत नसत तर ते मुलांचा सर्वांगीण विकास कसा करून घेता येईल, याकडे त्यांचे अधिक लक्ष असायचे .मी पंडेवाडी येथे शिकायला गेलो. आणि आमच्या गुरुजींचा पूर्ण सहवास मला लाभला .या तीन वर्षांच्या काळामध्ये मी खूप काही शिकलो .सर्व विषयांची माझीचांगली तयारी झाली .पुढे सातवीच्या परीक्षेत मी जिल्ह्यात पहिला आलो आणि राज्याच्या यादीत माझा समावेश झाला. तो मान मला मिळाला .शिक्षणाचा हा महामेरू आमच्या घरीच असल्यामुळे आम्हाला त्याचा जास्त फायदा झाला .पण अधिक फायदा झाला असता .तेवढा फायदा करून घेता आला नाही. हे आमचे दुर्दैव.
गुरुजींनी आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मला त्यांच्या सल्ल्याने मी पुढील शिक्षण घेतले. चांगल्या गुणांनी पास होऊन पुढे इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. आणि तेथेही चांगल्या गुणांनी पास होऊन सध्या मी ठाणे येथे इंजिनीयर म्हणून काम पाहत आहे .आज मी जो उभा आहे तो त्यांच्यामुळेच . त्यांचे बहुमोल मार्गदर्शन जर मला आणखी मिळाले असते, तर मी अजून कितीतरी पुढे गेलो असतो. यापुढेही त्यांचे कार्य असेच पुढे चालत राहो, हीच अपेक्षा .आज ते शिक्षण विस्तार अधिकारी या पदावरून निवृत्त होत आहेत. आमच्या कुटुंबातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणून, एक अभ्यासू व्यक्ती म्हणून ,अगदी ध्रुव ताऱ्यासारखी असणारी, अपार कष्ट करणारी व्यक्ती म्हणून, राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारी आणि संपूर्ण जिल्ह्यात राज्यात एक उत्कृष्ट लेखक म्हणून त्यांचे ओळख आहे .याचा आम्हा सर्व कुटुंबियांना अभिमान आहे .त्यांना सेवानिवृत्तीनिमित्त खूप खूप शुभेच्छा.
संजय कोंडीराम पाटील
सावर्डे पाटणकर
Comments
Post a Comment