ताठ कण्याचा मुख्याध्यापक
__________________🖋️
*..ताठ कण्याचा मुख्याध्यापक*
राधानगरीला गटशिक्षणाधिकारी पदावर हजर झाल्यानंतर अनेक शाळा, शिक्षक, संघटना, लोकप्रतिनिधी इत्यादी विविध स्तरातील व्यक्तींशी शैक्षणिक प्रशासनाच्या अनुषंगाने संपर्क आला.राधानगरी तालुका शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात नेहमीच अग्रेसर असल्याचे यापूर्वी वाचले होते.इथले शिक्षक, संघटना प्रमुख, लोकप्रतिनिधी,पालक, ग्रामस्थ, पत्रकार इत्यादी सगळेच शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी व स्पर्धात्मक क्षेत्रात तालुक्याचा नावलौकिक टिकवण्यासाठी आग्रही असून त्यासाठी काम करताना दिसतात.तालुक्यात २०५ जिल्हा परिषद शाळा असून त्यांमधील ४६ शाळांना पात्र मुख्याध्यापक शाळा आहेत.यांमध्ये राधानगरीच्या पूर्वेला असलेल्या विद्या मंदिर तिटवे शाळेचा समावेश होतो.
तिटवे गावातील जिल्हा परिषद शाळेचा पट २००पेक्षा जास्त असल्याने या शाळेला पात्र मुख्याध्यापक पद मंजूर आहे.शैक्षणिक विश्वात असं म्हटलं जातं की,जसे मुख्याध्यापक तशी शाळा.त्यामुळे शाळेच्या प्रशासनात आणि गुणवत्तापूर्ण कामात मुख्याध्यापक हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो.तिटवे हे गाव गारगोटी-कोल्हापूर राज्य मार्गावर मुख्य रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटर पूर्वेला आहे. या गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित श्री संभाजी पाटील हे आहेत.सर्वसाधारणपणे मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीने आलेला अध्यापक हा प्रदीर्घ काळ शिक्षक पदावर काम केलेला शिक्षक असतो.त्यांना अध्यापनाचा व वर्गपातळीवरील कामाचा, मुलांच्या शिकण्याचा-शिकवण्याचा खूप अनुभव असतो.असा समृद्ध शैक्षणिक अनुभव, शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या पन्नाशीनंतर सुद्धा तरूणांसारखा उत्साह घेऊन संभाजी पाटील हे शिक्षक मुख्याध्यापक पदावर हजर झाले.
माझ्या दोन अडीच वर्षांच्या कालावधीत श्री संभाजी पाटील सरांशी अनेक वेळा संपर्क आला.मी ऑक्टोबर २०२० मध्ये राधानगरीत हजर झालो, त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव होता.शाळा बंद होत्या;पण तालुक्यातील अनेक शाळांमध्ये कोरोनाची योग्य ती काळजी घेऊन काही वर्गातील मुलांचे तास घेतले जातात, असं मला समजले.नुकताच शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता.त्यामुळे मी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शाळा भेटी द्यायला सुरुवात केली.तिटवे शाळेचे दोन विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्ती धारक होते.तसेच आठवीचे विद्यार्थी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होते.त्यामुळे एक दिवस मी तिटवे शाळेला भेट दिली.शाळेत पाचवी व आठवीचे वर्ग सुरू होते.शिक्षक व विद्यार्थी अध्ययन अध्यापनात दंग होते.मी अभिनंदन करून शेरा लिहिला.व मुख्याध्यापक कोण?याची माहिती घेतली.तर संभाजी पाटील हे राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक आहेत, हे समजले.आठवीच्या मुलांनी मोठ्या उत्साहाने सांगितले की आमचे मुख्याध्यापक सर आमचे एन एम एम एस चे तास घेतात.इंग्रजी शिकवतात,हे ऐकून मला समाधान समजले.तिथले मुख्याध्यापक प्रशासकीय कामासोबतच वर्ग अध्यापन करतात हे मुलांकडून ऐकल्यावर सुखद धक्का बसला.
तिटवे गावातील शाळा बांधकाम, शालेय पोषण आहार याबाबत नेहमीच तालुका व जिल्हा स्तरावर येत होत्या.शाळेचे काम उत्कृष्ट होते.मुख्याध्यापक संभाजी पाटील व सर्व शिक्षक स्टाफ उत्तम प्रकारे काम करते असे;पण या तक्रारीमुळे प्रशासनाला चौकशी करणे भाग पडायचे.अशी वेळी मुख्याध्यापक संभाजी पाटील हे स्थिरपणे,मन शांत ठेवून आणि आत्मविश्वासाने चौकशीला सामोरे जाताना पाहिले.त्यांचा स्वतःवर व स्वतःच्या कामावर ठाम विश्वास होता.चांगले काम करतानाही काही वेळा अडचणी येतात;पण त्या अडचणींमुळे नाराज न होता किंवा कोणतीही दीर्घ मुदतीची रजा न घेता पाटील सर वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षांपर्यंत काम करत राहिले.खरोखर ताठ कण्याचा मुख्याध्यापक मला पाहायला मिळाला.
पाटील सर मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच संवेदनशील असतात.अनेक छोट्या मोठ्या उपक्रमातून मुलांना समृद्ध शैक्षणिक अनुभव देण्यासाठी स्टाफच्या मदतीने प्रयत्न करत असतात.निवृत्तीच्या अगोदर पर्यंत अगदीं शेवटच्या महिन्यापर्यंत त्यांचे उपक्रम चालूच असायचे.मुलांना खगोलीय ज्ञान मिळायला हवे, यासाठी त्यांनी शाळेच्या पटांगणावर रात्री दुर्बिणीच्या साहाय्याने आकाश दर्शन हा उपक्रम घेऊन मुलांना ग्रह,तारे, आकाशगंगा इत्यादी खगोलीय माहिती दिली.आपल्या शाळेचा गणवेश नेहमी आगळावेगळा, नावीन्यपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा असायचा.त्यामुळे तालुक्यातील कोणत्याही स्पर्धेच्या वेळी तिटवे शाळेची मुले तत्काळ नजरेत दिसून येत.
संभाजी पाटील सर आपल्या शाळेचे काम सांभाळून इतर शाळांना, शिक्षकांना प्रशासकीय व शैक्षणिक कामात मदत करत असतात.राधानगरी तालुक्याचा शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांक आला पाहिजे आणि तो टिकला पाहिजे.यासाठी देखील सर विविध शाळांमध्ये जाऊन पाचवी व आठवीच्या मुलांना मार्गदर्शन करत असतात.शिक्षकांना प्रोत्साहन देत असतात.N.G.O आणि रश्मीज् स्माईल ट्रस्टच्या माध्यमातून राधानगरी तालुक्यातील विविध शाळांना,स्मार्ट बोर्ड,खेळाचे साहित्य, स्कूल बॅग्ज, खेळाचे साहित्य इत्यादी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो.तालुका प्रशासनाने दिलेली कोणतीही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना संभाजी पाटील सर आपली सर्व कौशल्ये पण लावून ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असतात.यावर्षीच्या तालुका स्तरावरील सांस्कृतिक स्पर्धा आम्ही त्यांच्याकडे म्हणजे विद्या मंदिर तिटवे शाळेकडे दिल्या होत्या.त्यांनी नीटनेटके नियोजन करून सांस्कृतिक स्पर्धा उत्तम प्रकारे पार पाडल्या.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या कामाबरोबरच सरांना खेळाबाबतही विशेष आवड आहे.क्रीडांगणावर स्वतःचे वय विसरून मुलांमध्ये मिसळत असताना त्यांना खूप आनंद होतो.तालुका, जिल्हा स्तरावरील स्पर्धेच्या वेळी उपस्थित राहून मुलांना, शिक्षकांना प्रेरणा देऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण करताना मी त्यांना पाहिले आहे.या वर्षी विद्या मंदिर ऐनी शाळेची विद्यार्थिनी जिल्हा स्तरावर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम आली.योगायोग असा,मी त्या मुलांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो.त्याच वेळी संभाजी पाटील सर त्या मुलीचे अभिनंदन करण्यासाठी ऐनी शाळेत उपस्थित होते. त्यादिवशी यात्रेमुळे संभाजी पाटील सरांच्या शाळेला सुट्टी होती.सुट्टीदिवशी आपले वैयक्तिक काम करण्याऐवजी हा मुख्याध्यापक ऐनी शाळेत स्वतःच्या पगाराच्या पैशातून त्या मुलीला पाकिट देऊन अभिनंदन करण्यासाठी आला होता.असा माणूस विरळा नाही का? मला त्यांचा अभिमान वाटला.खरोखर एक हरहुन्नरी, संवेदनशील, प्रसंगी ताठपणे उभा राहणारा, एक राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षांनंतर ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहे.त्यांना माझ्याकडून मन:पूर्वक शुभेच्छा! यापुढील काळातही त्यांच्याकडून शैक्षणिक कामासाठी मदत, मार्गदर्शन, प्रेरणा मिळत राहावी हीच अपेक्षा!!
धन्यवाद.
बी एम कासार
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती राधानगरी
Comments
Post a Comment