ऐतिहासिक स्थळे आणि सुशोभीकरण
महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना हसन मुश्रीफ यांनी ऐतिहासिक स्थळांची दुरूस्ती, सुशोभीकरण करण्यासाठी नुकताच भरघोस निधी मंजूर केला आहे.त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.ऐतिहासिक स्थळांची डागडुजी झालीच पाहिजे.आपला तो ऐतिहासिक वारसा आहे.तो जपलाच पाहिजे. पण गड किल्ले किंवा ऐतिहासिक कोणत्याही वास्तू यांची डागडुजी करण्यासाठी इतिहास संशोधक यांचा किमान एकदा तरी सल्ला घेणे आवश्यक आहे.
ना.हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गड किल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी निधी मंजूर केला आहे,ही बाब अभिमानास्पद आहेच.पण विशाळगडावरील बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थळी दीड कोटीच्या वर निधी मंजूर केला आहे,याचे आश्चर्य वाटले. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाला जाताना त्यांना सहाशे बांधवांनी संरक्षण दिले होते. वाटेत घोडखिंडीत सिद्दी मसूदचे सैन्य महाराजांच्या अगदी जवळ आल्यावर बांदलांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले.रायाजी बांदल या तरुण सरदारांच्या नेतृत्वाखाली तीनशे मावळ्यांची एक तुकडी घोडखिंडीत थांबली आणि महाराजांच्या बरोबर तीनशे मावळे पुढे गेले.
इकडे घोडखिंडीत रायाजी बांदल यांच्याबरोबर संभाजी जाधव(सरसेनापती धनाजी जाधव यांचे वडील),विसोजी काटे, बाजीप्रभू देशपांडे अशा प्रमुख मंडळींसह तीनशे मावळ्यांनी सिद्दी मसूदच्या सैन्याशी घनघोर युद्ध केले.यांत या प्रमुख मंडळींसह तीनशे मावळे कामी आले. पण तत्कालीन संकुचित लेखकांनी घोडखिंडीत झालेली लढाई केवळ बाजीप्रभू देशपांडे यांच्या भोवतीच फिरवली आहे. आणि समाध्या बांधताना सुद्धा पक्षपातीपणा केला आहे. विशाळगडावर महाराज सुखरूप पोहोचल्यावर बोटावर मोजता येतील इतकेच मावळे वाचले.त्यांनी पावनखिंडीत झालेल्या लढाईचा वृतांत महाराजांना सांगितला.संकट टळल्यावर महाराज स्वतः बांदलांच्या घरी जाऊन बांदल मंडळींचे सांत्वन केले.
राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी बांदलांना आठवणीने निमंत्रण देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी यांच्या समाधीचे जीर्णोद्धार करण्यास कुणाचा विरोध असण्यास कारण नाही,पण रायाजी बांदल, विसोजी काटे, संभाजी जाधव यांच्या समाधी सुद्धा विशाळगडावर बांधल्या तर खऱ्या अर्थाने बांदलांना न्याय मिळेल.ना हसन मुश्रीफ यांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, श्रीमंत कोकाटे, जयसिंगराव पवार यांच्याशी आवश्य चर्चा करून निर्णय घ्यावा हीच माफक अपेक्षा...
संभाजी पाटील
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक, माजी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती राधानगरी
सत्य इतिहास लिहिणे हाच लेखकाचा धर्म असतो
ReplyDelete