माझी आई-माझे दैवत
माझ्या आईचे 10 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता वयाच्या त्र्याण्णवव्या वर्षी निधन झाले.माझ्या आईचे वयाच्या पंधराव्या वर्षी माझ्या पस्तीस वर्ष वयाच्या वडिलांशी लग्न झाले.माझ्या वडिलांचा हा पुनर्विवाह होता.कसलीही कुरकुर न करता माझ्या आईने संसाराला सुरुवात केली. आई स्वातंत्र्य पूर्व काळात पहिली शिकली होती.तिचा वर्गात पहिला क्रमांक होता.वर्गात सर्वात हुशार आणि चुणचुणीत होती.शेळ्यामेंढ्या राखण्यासाठी आईला शाळा सोडावी लागली होती.
आईचे माहेर आणि सासर एकाच गावात.सावर्डे पाटणकर हे आमचे गाव.तिचे माहेरच्या माणसांवर प्रचंड प्रेम असायचे.माहेरची माणसं घरी आली की आई खूश असायची.त्यांना चहापान लगेच करायची. तिचा सहा सुनांवरही वचक होता.चार भिंतीच्या आत तिचा एक हाती वट होता.कधी कधी ती सुनांवर हुकमत गाजवायची.यांतून सुनांवर अन्याय होत आहे हे तिच्या लक्षात यायचे नाही.
आईला तीन मुली आणि सहा मुलगे झाले.स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या माझ्या आईचे लग्न स्वातंत्र्य पूर्व काळातच झाले.नऊ भावंडात माझा आठवा क्रमांक लागतो. वयाच्या साठाव्या वर्षी माझ्या वडिलांना मधुमेह झाला होता.त्यावेळी मधुमेहावर फारसे परिणामकारक उपचार नसल्याने माझ्या वडिलांचा मृत्यू वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी म्हणजे 9 जानेवारी 1978 रोजी पहाटे पाच वाजता निधन झाले.त्यावेळी माझे वय तेरा वर्षे होते. मी खूप हाय खाल्ली होती. आठ दिवस शौचास झाले नव्हते.डॉक्टर बोलावून इनिमा करावा लागला होता.आईवर दु:खाचा डोंगर पडला होता.या धक्क्यातून सावरायला आईला वर्ष दीड वर्षे लागली.मी नववीला असताना आईच्या समोरच्या दातांची कवळी सुजली होती.वर नाकालाही सुज आली होती.आईने अंथरुण टाकले होते.माझी पोरं माळावर पडतील असे आईला सारखें वाटायचे.मला वाटायचं,आई तंबाखूची मसिरी लावते.म्हणूनच आईला काहीतरी आजार झाला आहे.आईला मी म्हटलं;आई,तू आम्हाला पोरकं करू नकोस.तंबाखूमुळेच तुला काहीतरी आजार झाला आहे.तू तंबाखूची मसिरी लावू नकोस.मी तुला दंत मंजन आणून देतो.आईने माझी मागणी मान्य केली.तेव्हापासून विको दंत मंजन लावत होती.
आईने आम्हाला कधीही रोखले नाही.पूर्ण स्वातंत्र्य दिले होते.शिकायला खूप मुभा दिली.आई मला म्हणायची, "शाळेत माझा पहिला क्रमांक असायचा" हीच गोष्ट मला प्रेरणा देऊन गेली.आणि पुढे शिकत गेलो.कष्ट करत शिकत गेलो. लहानपणापासूनच मला ईर्षेने काम करायची सवय होती,ती आईमुळेच..ती सवय पुढे तशीच राहिली.
लहान वयातच जबाबदारी पडल्यामुळे आम्ही सर्व भावंडे एकजुटीने काम करत होतो.शेतातील कामे करून, जनावरांना चरायला नेऊन शिक्षण घेत होतो. वडील खानदानी होते; त्यामुळे आम्हाला कधीही हलाकीचे दिवस काढावे लागले नाहीत.तरी सुद्धा आम्ही सायकल दुकान,दळप कांडप गिरण,चटणीचा डंग, शिवणकाम असे अनेक व्यवसाय केले.एक काळ असा होता की अख्ख्या गावाची कपडे आम्ही शिवायचो. दृष्ट लागावी असे सर्व काही चालले होते.आणि एक दिवस खरोखरच आमच्या कुटुंबाला दृष्ट लागली.वडील वारल्यानंतर दहा वर्षांनी वयाच्या अठ्ठावीसाया वर्षी माझ्या मधल्या भावाला tuberculosis (TB) झाला होता आणि दुर्लक्षामुळे त्याचे आकस्मिक निधन झाले. आईने हाही दुःखाचा डोंगर पचवला.यावेळी सुद्धा मला खूप त्रास झाला होता.माझ्या भावाची मुलं माळावर पडतील असे मला सारखे वाटत होते .पण मी तसे होऊ दिले नाही.भविष्यात मी खंबीरपणे माझ्या भावाच्या कुटुंबाच्या पाठिशी राहिलो.कौटुंबिक वादातून माझ्या भावाचे कुटुंब माहेरी राहायला गेले.पुढे एक दिवस मी मुलांना घेऊन आलो आणि तेव्हापासून ही मुलं गावी येऊ लागली.
माझ्या आईने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले. नऊ मुले नेटाने सांभाळली.आम्ही संयुक्त कुटुंबात अनेक दिवस काढले.पुढे एक एक भाऊ विभक्त राहू लागला.शेवटी कंटाळून मीही राहिलो. २०००साली आम्ही नवीन घरे बांधली आणि आईपासून थोडे दूर आलो.आई ,तू इकडे राहा,म्हटले की ती म्हणायची;मी माझ्या दादल्याच्या घरी राहणार .हा हट्ट आईने अखेरपर्यंत सोडला नाही.
दहा वर्षांपूर्वीची आईला हार्ट ॲटॅक आला.त्यावेळी मी उंदरवाडी ता कागल शाळेत होतो. सुदैवाने त्यादिवशी मी साडेपाचच्या दरम्यान घरी आलो होतो.घरी येताच आईला अस्वस्थ होत असल्याचे समजले.त्याच अवस्थेत आईला गाडीत घातले.सोबत अतुलला (पुतण्या)घेतले आणि गारगोटीला घेऊन गेलो.वाटेत असताना सुरेश दिनकर पाटीलला फोन करून सांगितले की गोंजारे डॉक्टरांना पूर्वकल्पना द्या.दवाखान्यात जाताच डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली.आणि आईचा धोका टळला. त्यावेळी माझ्या बहिणी दवाखान्यातच खूप रडत होत्या.आईने मला बोलावून घेतले आणि विचारले,"काय सांगितले रं डाक्टरनं?" मी म्हटलं,'अजून दहा वर्षे तुला काही होणार नाही '. आईने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि लेकींना शांत राहण्यास सांगितले.आई बरी होऊन घरी आली. आईला काहीतरी होईल या भीतीनं काही जणांचा विरोध असतानाही मी आणि माझा एक भाऊ (शिवाजी) आईला घेऊन कोल्हापूरला गेलो.ॲंजिओग्राफी केली.त्यात काहीही दोष नव्हता.आईला वाटलं मोठ्या दवाखान्यात मला काहीतरी चांगला उपचार केला.त्यामुळे आई ठणठणीत बरी होऊ लागली.औषधोपचा खर्च आम्ही सगळेच भाऊ करत होतो.
सन 2019 ला मोठा महापूर आला होता.वीजप्रवाह , भ्रमणध्वनी बंद होते.मी दहा बारा दिवस पुण्यात मुलगीकडे अडकून पडलो होतो.इकडे आई आजारी पडली होती.महापुराच्या चर्चा तिच्यापर्यंत येऊन धडकल्या होत्या. आई म्हणायची,'माझ्या संभाला काही सांगू नका.तो महापुरातून उड्या घेत येईल.' आईचा हा विश्वास मी कधीही गमावला नाही. पुण्याहून आलो,तेच दुसऱ्या दिवशी वारके डॉक्टर,बिद्रीला दाखवले .दीड महिना ट्रीटमेंट घेतली.आई बरी झाली;पण ताप काही कमी येत नव्हता.शेवटी सरवडे गावच्या आरडे डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली आणि आईचा ताप कमी झाला.
दोन वर्षांपूर्वी आई मला म्हणाली,"तू दहा वर्षे मला मुदत दिली होतीस.आठ वर्ष झाली बघ.दोन वर्षे राहिली. आईने कशी आठ वर्षे मोजली याचे गणित मलाही उमगले नाही.?आई आणि माझ्या नात्यातील bonding इतके पक्के होते की मी समोर येताच आईला माझ्या मनातले आणि मला आईच्या मनातले कळायचे.
२०२२ सालचा पावसाळा आईला खूप कठीण गेला.वयोमानाप्रमाणे तब्बेत क्षीण होत गेली. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात तर आईला उठून बसण्यासाठी आधाराची गरज लागायची.आईची सेवा करताना मला कधीच संकोच वाटत नसे.उलट आनंदच वाटायचा. मी आईची सेवा करताना कोणी आले तर आई म्हणायची,"कसा हाय माझा ल्योक!(मुलगा). आईला खूप अभिमान वाटायचा. मी कधीही आणि काहीही दिलं तरी मला वाईट वाटू नये म्हणून आई आवडीने खायची.
सोमवार दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी खूप थंडी पडली होती.म्हणून मी जाडजूड ऊबदार रघ घालून डोकं बांधून झोपवली होती.पण प्रचंड थंडी पुढे आईचा निभाव लागला नाही.सायंकाळी पावणेपाच वाजता माझी आई माझ्या हातचे अखेरचे पाणी घेऊन मला सोडून गेली.........
साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपदा.
ही कथा वाचणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना आणि आईवडिलांची मनापासून सेवा करणाऱ्यांना फलदायी,सुखाची,समाधानाची ठरो हीच सदिच्छा..............!!!!!!!!!!!
फार सुंदर ,ह्रदय हेलावणारे लेखन आहे. आईची सेवा करण्याचं भाग्य लाभले.भावपूर्ण श्रद्धांजली.
ReplyDelete