मातृतुल्य माझे गुरूजी
गुरु हा मेणबत्ती सारखा असतो जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वतः जळत राहतो..
या उक्तीप्रमाणे माझेही गुरुवर्य आदरणीय श्री संभाजी गोविंद पाटील सर आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सावर्डे पाटणकर गावचे प्राथमिक शिक्षक . सर यावर्षी 31 मे ला सेवानिवृत्त होत आहेत हे समजल्यानंतर मनाची थोडी चलबिचल झाली . एखाद्या लहान बाळाला त्याची आई सोडून दूर निघून जाते आणि बाळालाही आईचा लळा लागावा व आईलाही लेकरांना सोडून जाताना नाईलाज व्हावा अशी मनस्थिती सरांच्या बाबतीत सर्व विद्यार्थी बांधवांची झाली असावी .
विद्यामंदिर सावर्डे पाटणकर या शाळेत विद्यार्थी दशेत असताना इयत्ता सहावीच्या वर्गावर नव्यानेच श्री संभाजी पाटील सर हे आमच्याच गावातील शिक्षक म्हणून रुजू झाले. इयत्ता पाचवी पर्यंत मला धडशे लिहिता वाचताही येत नव्हते .मग नंबर तर दूरच ..इयत्ता सहावीला वर्गाच्या दोन तुकड्या पाडल्या गेल्या . त्यातील अ तुकडी या वर्गावर पाटील सरांची नियुक्ती झाली . त्या वर्गात मध्ये मला प्रवेश मिळाला .सरांना सर्व विद्यार्थी खूप घाबरायचे . शाळा सोडून घरी बसण्याचे कुणाचे धाडस व्हायचं नाही .. सरांचे व्यक्तिमत्वही खूप प्रभावी होते .मोठा आणि खणखणीत आवाज , शिस्त आणि शिक्षा या साऱ्यामुळे वर्गात अगदी शांतता असायची . सर वर्गात येत आहेत अशी जरी चाहूल लागली तर जो तो आपापल्या जागेवर वाचत बसायचा . मला तरी त्यांची खूप भीती वाटायची .सरांच्या धाकाने आणि प्रभावाने मी सहावी सातवी ला एकही दिवस शाळा चुकवली नाही . मनापासून अभ्यास करू लागलो ..अधून मधून सरांचा मार ही खायचा पण 'छडी लागे छम छम विद्या येई घमघम ' या म्हणीप्रमाणे माझी प्रगती होत गेली .
सर दोन्ही वर्गांना एकत्र करून गणित विषय शिकवायचे . त्यांचा हा आवडीचा विषय असल्यामुळे आमचाही विषय आवडीचा बनला .. इतिहास , भूगोल ,विज्ञान यासारख्या विषयांचे 50 ते 60 प्रश्न फळ्यावर उत्तरासहित लिहून द्यायचे त्यामुळे तो अगदी धडाच पाठ होऊन जायचा .त्यांनी शिकवलेला इंग्रजीचा एक पाठ अजूनही मला आठवतो तो म्हणजे धोंडीबा गोज टू द ऑफिस ..अशाप्रकारे माझी वाटचाल चालू होती ..मुले हुशार होत चालली होती .इयत्ता सहावीत माझा सातवा गुणानुक्रमांक आला . हा माझा आयुष्यातला पहिला क्रमांक असल्यामुळे मला आणि माझ्या घरच्यांना खूप आनंद झाला होता . तिथून पुढे मी कधीही नंबर सोडला नाही .
इयत्ता सातवी मध्ये सुद्धा त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आम्हाला मार्गदर्शन केले. अभ्यासाबरोबर सर क्रीडा स्पर्धा ही घेत . त्यात खो-खो , कबड्डी गोळा फेक आणि धावणे यामुळे आमच्यात खिलाडी वृत्ती जागी झाली .
याच शाळेत त्यांनी शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून शाळेसमोर जे आता उंच अशी पामची , शो ची नारळाची झाडे उभे आहेत ती लावून घेतली आणि त्या प्रत्येक झाडाची जबाबदारी आम्हा विद्यार्थ्यांवर देऊन ठेवली होती ; आम्ही सर्वांनी त्यांचे मनापासून संगोपन केले होते ..सरांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं आमच्यावर जे संस्कार केले त्याचा फायदा आम्हाला आज सुद्धा होत आहे .
यानंतर मी त्यांचा आदर्श घेत डीटीएड पूर्ण केलं आणि शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत आहे . या सर्व प्रवासात सरांनी मला खूप मदत केली आहे त्यांचे उपकाराचे ऋण मी तरी आयुष्यभर विसरू शकणार नाही .शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत येण्यासाठी ज्या परीक्षा द्याव्या लागतात जसे की TET , TAIT या सर्व परीक्षेसाठी सरांनी मला अगदी घरी येऊन अभ्यास कसा करायचा , पेपर सोडवताना काय काळजी घ्यावी , कोणत्या चुका टाळावेत , कोणती पुस्तक वाचावी , किती तास अभ्यास करावा या सर्व गोष्टींचे खूप मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे टीईटी पेपर एक व पेपर दोन एकाच वर्षी पास झालो . .त्यावेळेला सरांना खूप आनंद झाला होता ..माझाही सरासारखंच जिल्हा परिषद शिक्षक होण्याचा आणि त्यांच्यासारखं बनण्याचे स्वप्न आहे .जिल्हा परिषद शिक्षक भरतीच्या यादीत माझे नाव ज्यावेळी असेल तर मी सर्वप्रथम सरांना फोनवरून कळवेन ..
सरांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू असून ते खूप प्रामाणिक असून हाडाचे शिक्षक आहेत . त्यांचे वाचन तर अफाट आहे . त्यांनी स्वतः काही पुस्तक लिहिलेली आहेत ..सर विज्ञानवादी आणि पुरोगामी विचारांचे आहेत . . कुटुंबानंतर शाळा हेच त्यांचे दुसरे घर आहे
सरांनी आपले संपूर्ण आयुष्य आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित केले आहे .. त्यांच्या समग्र कार्याचा परिपाक म्हणजे त्यांना मिळालेला राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार होय ..
शेवटी मी एवढीच प्रवेश परमेश्वराकडे प्रार्थना करेन की निवृत्तीनंतर त्यांचे आयुष्य खूप आरोग्यदायी आणि सुख समाधानाची जावो . पुन्हा एकदा माझ्या गुरुवर्यांना मनापासून वंदन करतो आणि त्यांना दीर्घायुष्य इच्छितो ...
राहूल शंकर पंडे
सावर्डे पाटणकर
Comments
Post a Comment