परीसस्पर्श
परीस स्पर्श
वर्ष १९९६-९७. इयत्ता चौथी. माझ्या शालेय जीवनातला सर्वात महत्वाचा टप्पा. श्री संभाजी पाटील सर माझे वर्गशिक्षक म्हणून आले. ते वर्ष मी आजही अनुभवत असलेल्या यशाचा पाया होता. सर आम्हाला सुट्टीच्या दिवशी त्यांच्या घरी extra classes साठी बोलवायचे. स्पष्टच होतं की, त्यांनी आपल्या वैयक्तिक वेळेचा त्याग तेव्हापासूनच केला होता. काकी (त्यांच्या पत्नी) आम्हाला नाश्ता आणि चहा देत. शिक्षण विनामूल्य! चहा नाश्ता विनामूल्य!! सुट्टीच्या दिवशी!!! आजच्या व्यावसायिक युगात हे दुर्लभ झालंय. ही त्यांच्याकडून आणि काकींकडून एक निःस्वार्थ सेवा होती. किंबहुना तपश्चर्याच होती.
२५ वर्षांनंतरही मला आमचे शालेय दिवस आठवतात. विशेषत: आमचा इतिहासचा वर्ग. सर इतिहास जिवंत करायचे. छत्रपती शिवाजी महाराज आम्ही वर्गातच अनुभवायचो. शाहू महाराजांचा पोवाडा मला आजही पाठ आहे. विज्ञानात सरांचा केवळ पुस्तकांमधून शिकवण्यापेक्षा practical वर भर असायचा. गणित तर त्यांचा आवडता विषय. गणित शिकवताना त्यांच्यात प्रचंड उत्साह असायचा. या विषयाबद्दलची त्यांची आवड संसर्गजन्य होती आणि त्यांनी आम्हाला शिकवलेलं गणित आजही माझ्यासाठी एक मजबूत पाया आहे. सर फक्त शैक्षणिक विषयावर लक्ष केंद्रित करत नव्हते तर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर त्यांचा भर होता. त्यांनी आम्हाला गायन, नृत्य, अभिनय, खेळ, भाषण इत्यादी सारख्या extracurricular activities मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं. सर आमच्यासोबत Football खेळायचे, Cricket खेळायचे, Running करायचे. त्यामुळेच आमच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हायला मदत झाली.
धाडस आणि प्रसंगावधान हे व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत. एक प्रसंग आठवतोय. गाव ढेंगेवाडी - सकाळची वेळ. रस्त्याने एक मारका बैल मोकाट पळत चालला होता. लोक घाबरून पळत होते. बैलाला पकडणं महत्वाचं होतं. पण पकडणार कोण? जीव धोक्यात घालणार कोण? अचानक सर बैलाच्या मागे पळताना दिसले. त्यांनी त्याचा कासरा पकडला. बैल मागे वळून त्यांच्यावर धावून आला, इतक्यात सर शेजारच्या ट्रॉलीखाली शिरले, पलीकडून बाहेर आले आणि बैलाचा कासरा मालकाच्या हातात दिला. एखाद्या सिनेमामध्ये शोभेल असा तो क्षण होता. सरांच्याविषयी ऐकून होतो. आज पाहून आदर वाढला होता.
Everyone is a genius, but if you judge a fish by its ability to climb a tree, it will live its whole life believing that it is stupid. म्हणजेच, प्रत्येकजण कौशल्यवान आहे, परंतु जर तुम्ही एखाद्या माशाला त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवरून पारखलं तर तो संपूर्ण आयुष्य मूर्ख आहे असं मानून जगेल. ह्या वाक्याप्रमाणं सरांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक ताकद ओळखली. त्यांना त्यांच्या कलागुणांचा जोपासायला प्रवृत्त केलं. उदाहरणार्थ, त्यांनी एका विद्यार्थिनीची धावण्याचे कौशल्य ओळखलं, तिला आटेगाव ते सावर्डेपर्यंत दररोज धावायला सांगितलं, आणि रोज घरी नाश्ता देण्याचे सांगून तिला प्रोत्साहन दिलं. याउलट, जेव्हा त्यांनी पाहिलं की माझं हस्ताक्षर खराब आहे, तेव्हा त्यांनी माझ्याकडून इयत्ता चौथीमध्ये, दुरेघी वहीमध्ये वर्तुळे, तिरकस रेषा आणि सरळ रेषा यासारख्या अनेक basic गोष्टींचा सराव करून घेतला. He always knew - Go back to basics when things seem complicated.
सरांसोबतची दोन वर्षे माझ्या शालेय आयुष्यातली सर्वात महत्वाची वर्षे होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यात पहिला आलो. इयत्ता पाचवीत असताना सैनिक स्कूल आणि नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत दोन्ही ठिकाणी निवड झाली. या सर्व यशाचे श्रेय मी सरांनाच देतो. ते नेहमीच विद्यार्थ्यांच्या यशात त्यांचं स्वतःच यश पाहत आले आहेत. मी पंडेवाडी शाळा सोडून जाताना सरांना गहिवरून आल्याचं मी पाहिलं आहे. त्याचं कारण म्हणजे मी त्यांचा लाडका विद्यार्थी होतोच (मला असं मानायला आवडेल) पण त्याहून जास्त म्हणजे मी त्यांच्या जिवलग मित्राचा मुलगा होतो. माझी सैनिक शाळेत निवड झाल्यावर सरांनी दिलेली भेट माझी आजपर्यंतची सगळ्यात आवडती भेटवस्तू आहे. ती ज्ञानेश्वरीची प्रत आजही माझ्याकडं आहे.
सैनिक स्कूलमध्ये गेल्यावर मी सरांना एक पत्र लिहिलं. पंडेवाडी शाळेत पहिला येणारा मी, कुठेतरी pass होण्यासाठी struggle करत होतो. मराठीतुन इंग्रजी माध्यमात जाणाऱ्या बहुतांशी मुलांना हा problem सुरुवातीला येतोच. मनोबल खचलं होतं. त्या पत्राचं उत्तर म्हणून सरांनी मला एक पत्र लिहिलं. ते पत्र प्रचंड morale booster प्रेरणा देणारं होतं. ते सुंदर हस्तांक्षरात लिहिलेलं पत्र मी वर्षानुवर्षे जपून ठेवलं. त्यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द खरा ठरला. एका वेगळ्या प्रसंगी मी जेव्हा कांजण्याने आजारी पडलो तेव्हाही सरांनी माझ्या पप्पांसोबत सैनिक शाळेपर्यंत प्रवास करून त्यांच्या अतुट पाठिंब्याचं आणि आपुलकीचं दर्शन घडवून दिलं.
बरेच शिक्षक हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करतात. बऱ्याच वेळा बाकीच्या मुलांवर जास्त लक्ष देणं आवश्यक असतं. सरांना हे नेहमीच माहीत होतं आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी अतोनात कष्ट घेतले. ह्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. त्यांनी घेतलेल्या कष्टाची पोचपावती म्हणूनच त्यांना २०१८ चा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. सर मला वडिलांसारखेच आहेत. त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच प्रेरणा देणारं आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की श्री संभाजी पाटील सर मला शिक्षक म्हणून लाभले आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं.
सरांना, काकींना, शुभम आणि स्वातीला त्यांच्या आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा.
बाळकृष्ण चंद्रकांत पाटील
ढेंगेवाडी
Comments
Post a Comment