शिक्षण क्षेत्रातील देवमाणूस.. संभाजी पाटील सर
शिक्षणक्षेत्रातील देवमाणूस : श्री. संभाजी पाटील सर
असं म्हणतात की आयुष्याला खऱ्या अर्थाने जर कशामुळे किंमत प्राप्त होत असेल तर ती केवळ नि केवळ 'शिक्षणानेच '. माणूस हा आयुष्यभर काही ना काही शिकतच असतो. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर मनुष्याला गुरु, मार्गदर्शक हे भेटतच असतात. यात, आपल्या जन्माच्या अगोदर पासून आपल्यावर गर्भसंस्कार करणारी 'आई' ही आपली गुरु असते. त्यानंतर आयुष्याला एक महत्वपूर्ण कलाटणी देण्यासाठी आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाच्या अश्या काही व्यक्तींचा प्रवेश होतो. ते म्हणजे आपले 'शिक्षक '.
शाळा, विद्यालय, महाविद्यालय या सर्व शिक्षण प्रवाहाच्या समुद्रात शिक्षक रुपी ज्ञानाच्या लाटा ह्या आपल्या आयुष्याला पैलू पाडण्याचे महान कार्य करत असतात. यात तुलनेने प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे योगदान आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रवासात अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. कारण, शिक्षण प्रवाहातील ह्या पहिल्या टप्प्यात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता बनवण्यापासून ते अगदी शिक्षणाबद्दल, शाळेबद्दल त्याच्या मनात आवड निर्माण करून, त्याला ह्या शर्यतीत टिकवण्यासाठीची तारेवरची कसरत येथील शिक्षकांना करावी लागते. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी धडपड करावी लागते. अशीच धडपड माझ्या प्राथमिक शिक्षणाच्या कालावधीत करून माझ्या आयुष्याला अर्थ निर्माण करून दिला शिक्षणक्षेत्रातील 'देवमाणूस' राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित आदरणीय श्री. संभाजी पाटील सर यांनी.
पाटील सरांना देवमाणूस म्हणावयाचे कारण म्हणजे पाटील सरांनी विद्यार्थ्यांप्रति दिलेलं योगदान व त्यांचं महान कार्य. आजपर्यंत सरांनी माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांची आयुष्य घडवली आहेत. केवळ आपली नोकरी म्हणून नाही तर विद्यार्थ्यांचे खरोखर काहीतरी भलं व्हावं, अगदी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांनी देखील नाव कमवावं, आपलं अस्तित्व निर्माण कराव म्हणून पाटील सरांची तळमळ पाहता माणसातील ह्या खऱ्या देवासमोर हात जुळल्या शिवाय राहतच नाही. परिसाप्रमाणे जातील तिथली शाळा बदलण्याच, भेटतील त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याच सोनं करून; त्याच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश टाकण्याचं महान कार्य आमच्या ह्या देवमाणसाने केलं.
बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना शिक्षकांचा राग येतो, सतत अभ्यास करायला देतात म्हणून कंटाळा देखील येतो. पण, पाटील सर हे शिक्षकाप्रमाणे न वागता प्रत्येक विद्यार्थ्याचा 'मित्र ' होऊन प्रत्येकाच्या कलाने घेऊन त्याचा शैक्षणिक उद्धार केला. सरांच्या शिकवण्याच्या पद्धती, समजावून सांगण्याच्या विविध क्लुप्त्या पाहिल्यावर कोणालाही शिक्षणाची ओढ निर्माण होईल. विविध स्पर्धा, परीक्षांसाठी सरांचं मार्गदर्शन मिळणं म्हणजे आपण जवळपास यशाला गवसणीच घालण्यासारखं आहे. त्यामुळेच तर सर ज्या शाळेत असतील त्या शाळेचा निकाल हा उंचावतोच आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये गुणगौरव देखील होतो.
सरांमध्ये इतके विविध पैलू आहेत, की त्यांना 'अष्टपैलू' म्हणणं हे देखील खूप छोटं होईल. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता इतर गोष्टींची देखील समज मिळायला पाहिजे यावर सरांचा अधिक भर असतो. प्रत्येक विद्यार्थ्याला या समाजात वावरण्यासाठी व आपली ओळख निर्माण करण्यासाठी परिपक्व बनवण्याचं काम पाटील सरांनी केलं. सर स्वतः ज्ञानाच भांडार असल्यामुळे व प्रत्येक गोष्टीत तरबेज असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या कळगुणांना वाव देण्यासाठी त्यांनी मदत केली. अगदीच सांगायचं झालं तर मला स्वतःला लिखाणाची आवड आहे. मी सहावीत असताना कविता, लेख लिहायला सुरुवात केली. आणि ही सुरुवात पाटील सरांमुळेच झाली. तेव्हा देखील सर्व गोष्टी समजावून सांगण्याचं, माहिती देण्याचं काम सरांनी केलं. अगदी आजदेखील सर मला मार्गदर्शन करतात. आज माझ्या लिखाणामुळे माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली, आणि ह्या सर्वाचं श्रेय फक्त नि फक्त पाटील सरांनाचं जातं.
ज्या शाळेत सरांची बदली होईल, त्या शाळेत विविध उपक्रम राबवून शाळेचं, गावाचं, विद्यार्थ्यांचं नाव उंचावण्यासाठी सरांनी प्रयत्न केले. अगदी मला आठवतं सर आमच्या गावातल्या शाळेत असताना त्यांनी 'आठवडी बाजार ' हा उपक्रम पहिल्यांदाच राबवला होता. त्यावेळी आम्ही विद्यार्थ्यांनी वेगवेगळी दुकाने लावली होती. त्या मागचं उद्दिष्ट होत की आम्हाला आर्थिक बाबींची समज व्हावी. त्यावेळी मी सातवीत होतो, परंतु त्या दिवसापासून मला थोडंफार का होईना पण आर्थिकदृष्ट्या स्ववलंबी होण्याचं बळ मिळालं.
सरांचा स्वभाव असा आहे की समोरचा व्यक्ती अगदी पटकन प्रभावीत होऊन जातो. अगदी शांत, संयमी स्वभावामुळे विशेष आकर्षण वाटते. एवढे ज्ञान असून, विविध पुरस्कारांचे मानकरी असून कोणत्याही गोष्टींचा त्यांना कधीही गर्व नाही. अगदी सामान्य लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये मिळून - मिसळून सर जसे वागतात त्यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा सहज भासतो.
त्याचप्रमाणे, सरांमध्ये एक विशेष शैली आहे, ती म्हणजे 'लेखनशैली '. अगदी 'मराठी - इंग्रजी व्याकरणापासून ते जनरल नॉलेजपर्यंत', 'गड -किल्यांच्या माहितीपासून ते नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या माहितीपर्यंत' अशा नानाविविध विषयांवरील सरांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. अगदी प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यापासून ते स्पर्धा - परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत सर्वजण सरांची पुस्तके अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच अवांतर वाचन व ज्ञानवृद्धीसाठी कोणीही सरांच्या पुस्तकांचं वाचन करू शकतं. स्वतः उत्कृष्ट लेखक असल्यामुळे सरांचं मार्गदर्शन मला प्रचंड उपयुक्त ठरतं.
सर आता निवृत्त होताहेत. पण त्यांच्याकडे पाहून ते अजिबात वाटत नाही. कारण,दररोजच्या व्यायामामुळे तंदुरुस्त व मजबूत बनवलेलं त्यांचं शरीर आणि चेहऱ्यावरचं गोड स्मितहास्य अगदी विशीतल्या तरुणाला देखील लाजवेल असंच आहे. पण, एक प्रक्रियेचा भाग म्हणून सर औपचारिकरित्या निवृत्त होतील. पण, मला ठाम विश्वास आहे त्यांच्या आतील शिक्षक कधीही निवृत्त होणार नाही. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सर ज्ञानदानाच काम करतच राहतील. माझ्यासारखे विद्यार्थी सरांना वेळोवेळी मार्गदर्शनासाठी सतवत राहतील. आणि सर देखील आम्हाला वेळोवेळी ज्ञानदान करत राहतील. सरांनी हजारो मुलांची आयुष्य घडवली आहेत. त्यांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी शब्दकोषामध्ये शब्दचं सापडणार नाही. आम्ही विद्यार्थ्यांनी त्यांचे कितीही आभार मानले तरी ते अपुरेच पडतील. अगदी वैयक्तिकरित्या माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यात खरंच सर देवाप्रमाणे आले आणि त्यांनी माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. सर यापुढे देखील असंच नि:स्वार्थीपणे प्रत्येकाला ज्ञानदानाच काम करतच राहतील. त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या महान कार्यासाठी संपूर्ण विद्यार्थीवर्गाकडून सलाम!
शब्दांकन :-
विराज विलास कोरगावकर
द्वितीय वर्ष, विद्युत अभियांत्रिकी,
शासकीय तंत्रनिकेतन, मालवण
(सरांचा एक माजी विद्यार्थी )
मो. नं :-9607541305
Comments
Post a Comment