दीपस्तंभ
दीपस्तंभ
आपल्या जीवनामध्ये अनेक व्यक्ती येत असतात . काही नातेसंबंधातून,काही मित्रांच्या रुपाने, काही सहकाऱ्याच्या भूमिकेतून जीवनात प्रवेश करतात . या सर्वांच्या विचाराचा आपल्यावर थोडाफार का होईना प्रभाव पडत असतो . मला ज्यांची लहानपणापासून साथ संगत मिळाली ते संभाजी पाटील सर तसे नात्याने माझे चुलते लागतात ..त्यातच वडिलांचे किराणा मालाचे दुकान त्यांच्याच घरी भाड्याने होते ; त्यामुळे त्यांचा सहवास अगदी शालेयदशेत असतानाच मिळायला सुरुवात झाली आणि कळत नकळत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव माझ्यावर पडत गेला . या संपूर्ण गौरवांकामध्ये त्यांचे अनेक विद्यार्थी यांनी आपले मनोगत मांडलेले आहे .. तसा मी त्यांचा लौकिक अर्थाने विद्यार्थी नाही पण त्यांच्याकडून अनेक विषयांचे बाळकडू मला मिळाले..
पूर्वी सातवीची एक केंद्र परीक्षा व्हायची त्यासाठी शिक्षका-शिक्षकांमध्ये प्रचंड चुरस असायची . योगायोगाने विद्यामंदिर पंडेवाडी या ठिकाणी पाटील सरांचा सातवीचा वर्ग आणि विद्यामंदिर सावर्डे पाटणकर या ठिकाणी माझे गुरुवर्य श्री सदाशिव लक्ष्मण कुंभार गुरुजी यांचा सातवीचा वर्ग यामध्ये स्पर्धा होती . त्यावेळेला संभाजी पाटील सरांची शिष्यवृत्ती मध्ये त्या वर्गातील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले होते. त्यामुळे केंद्र परीक्षेमध्ये सुद्धा त्यांच्याच मुलांचा नंबर येणार याची खात्री होती . पण त्यांच्या घरी चाललेले त्या मुलांच्या वरील त्यांचे तास मी अगदी जवळून पाहायचो..आणि मलाही वाटायचे की माझा सुद्धा या परीक्षेमध्ये नंबर यायला हवा. आमचे कुंभार गुरुजी सुद्धा प्रचंड क्षमतेने आमच्यावर काम करत होते. त्याचाच परिपाक म्हणून माझा त्या परीक्षेमध्ये केंद्रात प्रथम क्रमांक आला त्यावेळेला त्यांनी जवळ घेऊन माझ्या पाठीवर मारलेली थाप मला आजही आठवते .
मला वाचनाची प्रचंड आवड आणि संपूर्ण गावांमध्ये एकमेव असणारे ग्रंथालय त्यांच्याच घरी होते . माझी वाचनाची आवड त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी मला एक दिवस जवळ बोलावून सांगितलं की ही सर्व पुस्तकांची कपाटे तुझ्यासाठी सदैव उघडे असतील ; विशेष म्हणजे त्यांच्या घरातील कुणीही मला त्यांच्या कपाटातून पुस्तके घेताना अटकाव केला नाही .. त्यामुळे अगदी आठवी /नववीला असतानाच छावा, मृत्युंजय ,पाणीपत यासारखी मोठी पुस्तक वाचनात येऊन गेली जी त्या काळात मिळवणे तस दुर्मिळ होतं. आणि विचारांची प्रगल्भता माझ्यामध्ये निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे ते त्यांचं ग्रंथालय आणि त्यावेळी त्यांनी दिलेली मुभा ..
मला आठवते सन 1992 ला आमच्या वडिलांनी घर बांधायला काढले .त्यावेळेला ते प्राचार्य . एम् . आर . देसाई पतसंस्थेमध्ये चेअरमन म्हणून कार्यरत होते ; अशा वेळेला त्यांनी आपल्या नावावर 20000 रुपयाचे आकस्मित कर्ज काढून आमच्या वडिलांना दिले .. त्यावेळेला वीस हजार ही रक्कम तशी फारच मोठी होती पण त्यांनी कोणताही विचार न करता ती वडिलांना देऊ केली त्यामुळे आमचं घर उभा राहणं शक्य झालं .
डी. एड्. झाल्यानंतर नोकरीची सुरुवात चंदगड या ठिकाणी झाली आणि सन 2005 साली राधानगरी तालुक्यामध्ये बदलीने हजर झालो .त्यावेळेला शाळेचे गाव मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले पण नेहमीप्रमाणे राजकारण आडवे आले आणि मला अपेक्षित असणारी शाळा मिळत नव्हती त्यावेळेला कुमार विद्यामंदिर राधानगरी ही तालुका शाळा रिक्त होती ती शाळा मिळण्याची संधी होती . त्यावेळेला अनेक लोकांनी मला तालुका शाळा आहे खूप जबाबदारी असते , सर्व अधिकारी त्या ठिकाणी व्हिजिट देतात अशी भीती घातली होती ; त्यामुळे थोडा डळमळीत होतो पण पाटील सरांनी मला एकच वाक्य सांगितले ' ' विश्वास ही एक मोठी संधी आहे ..तालुका शाळेमध्ये मध्ये जर कामाची छाप पाडलीस तर संपूर्ण तालुक्यामध्ये तुझी ओळख तुला दाखवता येईल ' आणि तो शब्द मी शिरोधार्य मानून एक आव्हान म्हणून कुमार विद्यामंदिर शाळा स्विकारली आणि खरोखरच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी मनासारखे काम करण्याची संधी प्राप्त झाली .त्यांचे असे अनेक सल्ले दूरदृष्टीचे असायचे त्यामुळे माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा फायदा झाला...
सातत्याने संपर्कात असल्यामुळे त्यांच्या अनेक गोष्टी पाहून शिकत गेलो .विशेषतः त्यांचे उपक्रम आणि त्यांनी ठेवलेल्या त्याच्या नोंदी या गोष्टी पाहून मलाही तशा पद्धतीने सगळा संग्रह करण्याची आवड निर्माण झाली . त्यांना ज्या वेळेला जिल्हा परिषदचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तेव्हा मनात कुठेतरी भावना जागृत झाली की आपल्याला सुद्धा असा पुरस्कार मिळायला हवा ; त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा माझी वाटचाल सुरू राहीली आणि त्याचा परिपाक म्हणजे सन 2018 चा मलाही कोल्हापूर जिल्हा परिषदचा पुरस्कार मिळाला .
संभाजी पाटील सरांचं व्यक्तिमत्व करारी आहे . अनेक वेळेला ते आपले तत्वाशी कधीच तडजोड करत नाहीत . शिक्षकांच्या संघटनेत काम करत असताना त्यांनी कधीच आपल्या मताशी प्रतारणा केली नाही . त्यांचा पिंड आदर्श शिक्षकाचा असल्यामुळे ते शिक्षकांच्या भूमिकेतच जास्त समरस होतात त्यामुळे राजकारणातील शुचिता त्यांनी शेवटपर्यंत जपली . त्यामुळे अनेक वेळेला त्यांना त्यांच्या पदाला साजेसे पद मिळाले नाही . पण त्याची त्यांनी खंत कधी बाळगली नाही पण सेवानिवृत्तीच्या शेवटी शेवटी प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये संचालक पदावर त्यांची निवड झाली आणि निसर्गानेच त्यांच्या कार्याची दखल घेतली असं म्हणावे लागेल ..
अशा या ज्ञानतपस्वी ज्ञानयोगी व्यक्तिमत्त्वाला सेवानिवृत्तीच्या निमित्ताने उदंड आयुष्य आणि निरामय जीवन इच्छितो आणि थांबतो .
श्री . विश्वास पांडुरंग पाटील
विषय शिक्षक , केंद्र शाळा फेजिवडे , तालुका - राधानगरी
Comments
Post a Comment