आमचे शिस्तप्रिय गुरूजी

 _-------+++++-----


    आमचे शिस्तप्रिय गुरूजी 


      आदरणीय गुरुजी, श्री संभाजी गोविंद पाटील (राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित)

कवी मंगेश पाडगावकर म्हणतात,आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं.रिकामं तर रिकामं,लिहिलं तर छान असतं.

पहिलं पान जन्म आणि शेवटचं पान मृत्यू असतं..... मधली पानं आपण भरायची असतात,कारण ते आपलं कर्म असतं......


          तसं पाहिलं तर प्रत्येकाची कर्म करायची पद्धत वेगवेगळी असते.पण आपल्या कर्माला उचित ध्येयापर्यंत पोचण्यासाठी जी तळमळ, धडपड व जिद्द हवी असते,ती धडपड मी फक्त माझ्या गुरूजींध्येच पाहिली.गुरूजी हा शब्द मनामध्ये एवढ्यासाठीच येतो,कारण सर म्हणायचे धाडस आज देखील होत नाही.कारण या व्यक्तीप्रती असणारी आदरयुक्त भीती आज देखील तितकीच आहे,जी वर्गामध्ये विद्यार्थी असताना होती.


           ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे,घडला पाहिजे व गुणवत्तेत सुद्धा चमकला पाहिजे,ही जिद्द मनामध्ये बाळगून विद्यार्थी घडविण्यासाठी ग्रामीण भागातील शाळांना प्राधान्य मानून गुरुजींनी आजपर्यंत ज्ञानदानाचे काम केले.गुरुजींच्या गाडीचा आवाज येण्यापूर्वीच विद्यार्थी वर्गात पोहोचलेला असायचा.एवढी आदरयुक्त भीती व शिस्त गुरूजींच्या प्रती भिनलेली होती.सकाळी साडेसात वाजता गुरूजी वर्गात असायचे.आणि ज्ञानदानाचा त्यांचा प्रवास कधी रात्री आठ,तर कधी नऊ वाजता थांबत असे.मला वाटते की विद्यार्थी जोपर्यंत कंटाळत नाहीत, तोपर्यंत गुरूजींना घरचा रस्ता दिसायचा नाही.खरं तर या कष्टाचं महत्त्व त्या वेळी आम्हाला कळलेच नाही.त्यामुळे माझ्या जीवनातील अस्तित्वाचे श्रेय मी गुरूजींनाच देतो.


            गुरूजी ज्या ज्या ठिकाणी गेले, त्या शाळेचे नंदनवन करून टाकले.शिक्षण, क्रीडा,कला वक्तृत्व किंवा निबंध स्पर्धा असो.... गुरूजी विद्यार्थ्यांमधील गुण हेरायचे आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मूर्तीला पैलू पाडायचे.कधी कधी ठरवून ढ विद्यार्थ्याला सुद्धा अभ्यासात गोडी निर्माण करायचे.


           असं म्हटलं जातं की, प्राथमिक शिक्षणामुळे जीवनाची दिशा ठरते.एक चांगला गुरू--उत्तम मार्गदर्शक यांच्यामुळे आपल्या जीवनाला कलाटणी मिळते.आईवडिलांच्या कष्टासोबतच एका चांगल्या गुरूमुळे आपल्या जीवनाचा पाया मजबूत होत असतो.त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो की,अशा चांगल्या गुरूंचा मला सहवास लाभला.आज गुरूजींच्या मार्गदर्शनामुळे आपल्या भागातील कितीतरी विद्यार्थी यशस्वी व आनंदी जीवन जगत आहेत.त्यामुळे सहवास जरी कायम सोबत नसला, तरी त्यांच्या प्रती आदर व प्रेम आजसुद्धा कायम आहे,यात शंका नसावी.


         विद्यार्थी दशेतील परिस्थिती व आमची सद्यस्थिती यांचा नकळत विचार केला, तर गुरूजींचा आमच्या जीवनात असणारा अनमोल वाटा लक्षात येतो.अन् न राहून मनामध्ये विचार येतो, की गुरूजी आमच्या जीवनात नसते, तर कदाचित मी कुठं असतो,कोण जाणे?  सेवानिवृत्ती ही औपचारिकता असली तरी गुरूजी निवृत्त होतील, असे मला वाटत नाही.विद्यार्थी घडवताना असताना तारूण्यातील उत्साह निवृत्तीच्या वयात देखील कायम आहे.शक्य आहे तेवढं ज्ञानदानाचे काम त्यांनी अखंडपणे सुरू ठेवावे,अशी अपेक्षा करतो.त्यांना उर्वरित आयुष्य निरोगी,उत्साही व आनंदी लाभो ही प्रार्थना करतो.माझ्या लेखनाचे श्रेय देखील त्यांनाच देतो व त्यांच्या कार्यासमोर नतमस्तक होऊन थांबतो.


          रामराज पाटील, पंडेवाडी

             (माजी विद्यार्थी)

Comments

Popular posts from this blog

तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

शर्ट पँट घातलेली मुलांची दुसरी आई

श्रीकृष्ण जन्माष्टमी