न संपणारी ज्ञानाचीशिदोरी.. संभाजी गुरूजी
न संपणारी ज्ञानाची शिदोरी : संभाजी गुरुजी
जीवनाच्या वाटेवर पावलापावलाला अनेक गुरु आपल्याला भेटत असतात पण काही गुरु आपल्या मनावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा कायमचा उमटवून जातात. गुरूंकडून आपण खूप काही शिकत असतो ;पण जीवन जगण्याची कला मात्र शिकावी ती आमच्या आदरणीय परम पूज्यनीय श्री. संभाजी गोविंद पाटील गुरुजी यांच्याकडून. यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करायचे म्हंटले तर 'अष्टपैलू ' हा शब्दसुद्धा अपुरा पडेल. शिक्षकी पेशाच आहे यांचा पण लिहिणे,सगळे मैदानी खेळ खेळणे, धावणे, लाठीकाठी, व्यायाम करणे, प्रत्येक गोष्टीत यांचे अव्वल स्थान. मला नेहमी प्रश्न पडतो की इतकं परिपूर्ण कोण कसं काय असू शकतं?. यांच्या सहजच्या दैनंदिन बोलण्यातून कधी आपण आयुष्यातील खूप महत्वाचे धडे शिकत असतो हे कळतही नाही. पण पावलापावलाला त्याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. यांच्यासारखे शालेय अभ्याससुद्धा मजेशीर पद्धतीने शिकवणारे शिक्षक असतील तर शिकण्यातील गोडीच वेगळी.
काही काही शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांना धाकात ठेवायला आवडते. मग मुलंही भीतीपोटी त्यांना आदर देतात . पण पाटील गुरुजींची शिकवण्याची शैलीच वेगळी. शिकवताना ते विद्यार्थ्यांमधीलच एक होऊन जातात. गुरु हा शिष्यांचा इतका चांगला मित्र असू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाटील गुरुजी. 2010-11 या शैक्षणिक वर्षात मी पाचवी नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी पाटील गुरुजींच्या घरी राहत होते. माझ्या शैक्षणिक जडणघडणीच्या काळात मला पाटील गुरुजी गुरुस्थानी लाभले हे माझं भाग्य. प्रत्येक विषय शिकवण्यात ते महारथी आहेतच ;पण विद्यार्थ्यांनाही त्या विषयाची गोडी कशी लागेल याची पुरेपूर काळजी ते घेतात. गृहपाठ पूर्ण न केल्यावर ते आम्हाला शिक्षा म्हणून 15 पाने शुद्धलेखन लिहायला सांगायचे. खरंतर ही शिक्षा म्हणावी तरी कशी?. कारण याचाही आम्हाला हस्ताक्षर सुधारण्यात फायदाच झाला. त्यांच्यामुळे मला अभ्यासाची गोडी लागली आणि अभ्यास कंटाळवाणा न वाटता गमतीशीर वाटू लागला. यांच्या सहवासात मी केवळ आठ महिनेच ज्ञान ग्रहण करू शकले. खरंतर शालेय अभ्यासक्रमातील धडे आठ महिनेच शिकले असं म्हणावं लागेल. कारण आयुष्याचे धडे यांच्याकडून अजूनही शिकत आहे.
अभ्यासक्रमातील धडे शिकवता शिकवता ते आम्हाला एक चांगला माणूस म्हणूनही घडवत होते. पाचवीच्या त्या एका वर्षात त्यांनी लावलेली शिस्त, चांगल्या सवयी आयुष्यभरासाठी माझ्या सोबत आहेत. त्यामध्ये रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे, सकाळी उपाशीपोटी भरपूर पाणी पिणे, जेवणानंतर लगेच पाणी न पिता एक तासाने पिणे या सवयीमुळे आपण निरोगी राहतो. परीक्षेची तयारी करता करता सरांमुळे नकळतपणे आमचा शारीरिक आणि व्यक्तिमत्त्व विकास होत होता हे मला आज कळतंय. पाचवीतील ते आठ महिने सुरवातीला रडत ;पण नंतर हसत खेळत सरांबरोबर भांडत कधी गेले कळलंच नाही. ते दिवस आठवले की डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही. ते दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते.
आपली मातृभाषा म्हणजेच मराठी शिकवताना मंत्रमुग्ध करणारे, इंग्रजी भाषेची गोडी निर्माण करणारे, गणितासारखा अवघड विषय स्वतःच्या क्लृप्त्या देऊन सहज सोपा करणारे, इतिहास रोमांचक कथांमध्ये सांगणारे, आयुष्याच्या बाजारातील तेजीमंदी ओळखून व्यवहारामध्ये जीवनाचे अर्थकरण शिकवणारे, भावी पिढीला आदर्शवत संस्कारांमध्ये रुजवणारे संस्कारगुरू म्हणजे आमचे पाटील गुरुजी. जिल्हा पातळीवरच नव्हे तर देशाच्या पातळीवर देशातील नेत्यांनी कोणत्या परिस्थितीत कसे योग्य निर्णय घ्यावेत ,याचे अचूक ज्ञान असल्यामुळे तुमच्यामध्ये असणारा दुर्दम्य असा दूरदृष्टिवाद आम्हाला पाहायला मिळतो. आणि आम्हाला आश्चर्य वाटते की, ते आम्हाला वास्तवामध्ये ठायी ठायी प्रत्ययाला येते. तुमच्या लिखाणात इतकी वास्तविकता असते की,वाचकांना विचार करायला भाग पाडते. सरांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते 'आदर्श शिक्षक ' हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही किती अभिमानास्पद बाब आहे. इतकं सगळं असूनही सरांना मात्र कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही.
'गुणवंत तुम्ही, कीर्तिवंत तुम्ही
तुम्हीच ज्ञानाचा सागर
नसे तयाचा गर्व तुम्हां
म्हणुनी सर्वजण करती तुमचा आदर करती तुमचा आदर '
सरांच्या या प्रवासात त्यांच्या सहचारिणी सौ. शारदा संभाजी पाटील मॅडम यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यात मॅडम बरोबरीने त्यांची साथ देतात. त्यांच्याकडूनही मी खूप गोष्टी शिकले आहे... मॅडमांना मी गुरुस्थानी मानते. सरांच्या घरी राहत असताना त्यांच्या शिकवणीबरोबरच गरज होती ती आपुलकीची, मायेची जी आम्हाला मॅडमांनी दिली. आईपासून दूर राहून त्यांनी आम्हाला आईची कमतरता कधी भासू दिली नाही. सरांच्या शिकवणीसाठी आम्ही जरी तिथे राहत असलो तरी टिकून राहिलो ते मॅडमांमुळेच.. जेवण करताना ताटातील सगळे पदार्थ संपवायचे असा त्यांचा नेहमी अट्टाहास असायचा. त्या आम्हांला सरांबद्दल, त्यांच्या आयुष्यातील प्रसंग एखाद्या गोष्टीप्रमाणे सांगायच्या. त्यातून आम्हांला नकळतपणे योग्य ते मार्गदर्शन मिळून जायचे. मला वाटते खऱ्या अर्थाने मॅडम या सरांच्या अर्धांगिनी शोभतात.
यावर्षी सर सेवानिवृत्त होत आहेत; पण शाळेशिवाय त्यांना काय करमणार नाही. त्यांचे शिकवण्याचे काम अविरतपणे चालूच राहील. केवळ आठ महिन्यातील त्यांची शिकवण मला आयुष्यभरासाठीचे ज्ञान देऊन गेली. सर मला नेहमी म्हणतात की, तू एक उत्तम लेखिका होऊ शकतेस. आज मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात अनेक वेळा यशापयशाला सामोरे जावे लागते. पण सरांचे शब्द माझे मनोधैर्य वाढवतात. त्यांचे मार्गदर्शन नव्याने बळ देते. सर म्हणाले ना की ' तू करू शकतेस. हार मानू नको ' मग माझा ढळलेला आत्मविश्वास आकाशाला गवसणी घालायला जातो. त्यांनी मला दिलेल्या कधीही न संपणाऱ्या ज्ञानाच्या शिदोरीसाठी मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहीन.
गुरुवर्य, आतापर्यंतचे तुमचे आयुष्य सुखासमाधानात गेले आहे. असेच नेहमी आनंदात राहा. आम्हांला मार्गदर्शन करत राहा. इथून पुढच्या वाटचालीस तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
तुमची,
स्वतःलाच पाटील सरांची सर्वात लाडकी विद्यार्थिनी म्हणवून घेणारी,
कु. ज्योती सर्जेराव जाधव (ज्योत्या)
Comments
Post a Comment