चिरतरुण व्यक्तिमत्त्व
**चिरतरुण व्यक्तिमत्त्व**
आज मी वयाची साठी पूर्ण करणार, माझ्या कामातून निवृत्त होणार आणि राहिलेले आयुष्य मस्त निवांतपणे घालवणार. आतापर्यंत जगलेल्या धावपळीच्या आयुष्याला थोडीशी विश्रांती देणार. सकाळी उठून मी चहा घेत वृत्तपत्र वाचत आराम खुर्चीत दारामध्ये सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये दिवसाची सुरुवात करणार. दुपारी जेवण झाल्यावर मस्तपैकी एक डुलकी काढणार आणि संध्याकाळी गावामध्ये एक फेरफटका मारून येऊन जेवून झोपी जाणार. अशी दिनचर्या असणारी किंवा अशा दिनचर्येची स्वप्ने बघणारा एक वर्ग या समाजामध्ये असतो. बहुदा ९९ टक्क्यांपेक्षा जास्त नोकरदार लोक या वर्गामध्ये मोडतो.
पण ज्या व्यक्तीबद्दल मी चार शब्द लिहिण्याचा जो काही छोटासा प्रयत्न करत आहे ती मात्र उरलेल्या एक टक्क्यांमध्ये मोडते. त्या राहिलेल्या एक टक्क्यांमधले ज्यांच्या वयाचा फक्त आकडा जास्त आहे पण मन, शरीर अंगात असणारी ऊर्जा आणि सळसळता उत्साह अजूनही तरुणांनाच काय पण शाळेतील मुलांनाही लाजवेल असे असणारे बाबा आता निवृत्त होणार आहेत. बाबा निवृत्त होणार म्हणजे काय हे मला अजूनही पडलेले कोडेच आहे. या व्यक्तीला शासन निवृत्त करेल पण स्वतःहून निवृत्त होऊन निवांत बसणाऱ्यातले हे नाहीत. सतत कार्य मग्न असणे हा त्यांचा गुणधर्म. सर्वांच्या प्रति प्रेम आणि सतत काहीतरी नवीन करण्याचा आणि शिकण्याचा ध्यास.
बाबांचे त्यांच्या आईवर जीवापाड प्रेम. आईचे ते एका लहान मुलासारखं कौतुक करायचे. आई म्हणेल ते ऐकायचे. आईसाठी खाऊ घेऊन जायचे औषध घेऊन जायचे. कुठलीही गोष्ट आईला कमी पडू दिली नाही. आईच्या प्रत्येक आजारपणात आईची तळमळतेने त्यांनी त्यांची काळजी घेतली. बाबा जुन्या आठवणी सांगतात , तेव्हा ते म्हणायचे माझ्या आईला कितीतरी वेळा मी मरणाच्या दारातून परत आणले. आईचा सुद्धा आपल्या मुलावर जीवापाड प्रेम होतं. एक गोष्ट इथे जाणीवपूर्वक सांगू इच्छितो 2019 ला बाबा पुण्यात आले होते भरपूर पाऊस होता नद्यांना पूर आला होता आणि तिकडे आईची तब्येत खूपच बिघडली होती बाबांना इकडून तिकडे जाता येत नव्हते. पण बाबांची आई म्हणत होती आणि माझ्या संभाला तेवढे कळवू नका. माझी तब्येत नाजूक आहे हे जर त्याला कळले तर तो पुराची काळजी न करता इथे येईल. असे होते बाबांचे आईवरच प्रेम आणि आईचा आपल्या मुलावरचा विश्वास.
खूप धीर आणि धाडस त्यांच्या अंगात ठासून भरलेलं आहे. चेहऱ्यावरचा शांतपणा आणि न चिडता शांतपणे मुद्देसूद बोलण्याची पद्धत यामुळे कितीही गुंतागुंतीचे प्रश्न त्यांनी सहजगत्या हाताळले आहेत. बाबांची आत्तापर्यंत 38 वर्षाची जी काही कारकीर्द आहे त्याच्याबद्दल बोलताना त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. बाबांची नोकरी जिल्हा परिषदेच्या शाळेत असल्यामुळे शाळा या शाळा व्यवस्थापन कमिटी जी गावातल्या लोकांची बनलेली असते त्या कमिटीची भूमिका सुद्धा महत्त्वाची असते. किती दिवस असे प्रसंग आले होते जेव्हा बाबा त्या शाळेमध्ये जाण्याआधी गावांमध्ये आणि शिक्षकांमध्ये तेढ होती. बाबा तिथे गेल्यामुळे तो दुरावा पूर्णतः नाहीसा झाला. गावातल्या लोकांचा शिक्षकांवरील विश्वास वाढला.गावातील लोकांमध्ये आणि शाळेतील शिक्षकांमध्ये जे काही वाद निर्माण झाले होते ,ते वाद त्यांनी सोडवले.
बाबांचा स्वभाव जितका शांत तितकाच तो कडक आणि कठोर ही आहे. एखाद्या गोष्टीबद्दल जर एखादा निर्णय त्यांनी घेतला तर ती गोष्ट ते तडीस नेऊनच थांबतात. जर ती गोष्ट बरोबर असेल तर ते कोणाचाही म्हणजे कोणाचाही विरोध जुमानत नाहीत.
विद्यार्थ्यांचं बाबांच्या वरच प्रेम सर्वश्रुतच आहे. या सर्व विद्यार्थ्यांबद्दल मला भयंकर हेवा वाटतो. शिक्षणाबद्दल प्रेम, आपुलकी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओढ निर्माण करण्याची कला असलेले शिक्षक शैक्षणिक आयुष्याच्या सुरुवातीच्या कालावधीमध्येच मिळणं म्हणजे खूपच मोठे भाग्य. जे भाग्य बाबांच्या हाताखालून गेलेल्या विद्यार्थ्यांचे होतं तसेच भाग्य अजूनही असंख्य मुलांच्या वाट्यास यावं अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना. बाबांचे कार्यक्षेत्र जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढावी आणि पुढील पिढीसाठी त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा.
बाबा तुम्ही असेच राहा आणि तुमच्या आयुष्यातील दुसरा डावही त्याच सळसळत्या उत्साहाने आनंदाने पार पाडा.
स्वाती आणि तुषार
Comments
Post a Comment