श्रीकृष्ण जन्माष्टमी
*____________________🖋️*
श्रीकृष्ण जन्माष्टमी
महान तत्त्वज्ञ, बहुजन समाजाचा प्रतिनिधी, आपल्या कर्तृत्वाने ज्यांना तमाम भारतीयांनी दैवत्व बहाल करून आपल्या हृदयात आणि देव्हाऱ्यात स्थान दिले, त्या श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता झाला.श्रीकृष्णाचे आयुष्य दोन युगांच्या जोडणीत गेले.साधारणत:एक युग म्हणजे ४ लाख ३२हजार वर्षे मानले जाते.कलियुग संपायला अजून ४ लाख २७ हजार वर्षे बाकी आहेत. श्रीकृष्णाचा जन्म झाला द्वापारयुगात आणि मृत्यू झाला तो कलियुगात. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि शंख वाजवून महाभारत युदृधाची (कौरव पांडव युद्ध)सुरूवात केली.तेथूनच कलियुगाची सुरूवात झाली.म्हणूनच श्रीकृष्णाला युगप्रवर्तक म्हटले जाते.
श्रीकृष्णाचा मामा कंस याला कोणीतरी ज्योतिष्याने सांगितले की तुझ्या बहिणीच्या आठव्या पुत्रापासून तुझा वध होईल.आपला मृत्यू टाळण्यासाठी कंसाने श्रीकृष्णाच्या आईवडिलांना(देवकी-वसुदेव) तुरुंगात डांबले. मृत्यूचे भय कंसाच्या मानगुटीवर एवढे बसले होते की, त्यावेळी कोणीही काहीही सल्ला दिला तरी त्याला तो पटायचा.मग हा आठवा पुत्र अधेमधेच जन्माला आला तर, तो मुलगीच्या रूपात जन्माला आला तर...! अशा शंका कुशंका कंसाच्या मनात येऊ लागल्या.त्यामुळे त्याने तुरूंगातच जन्माला आलेले देवकी-वसुदेवाचे प्रत्येक मूल ठार मारू लागला.देवकी-वसुदेव तुरूंगात असल्यामुळे असहायतेने काहीही करू शकत नव्हते.देवकी आठव्यांदा गरोदर राहिली, तेव्हापासूनच त्यांनी पहारेकऱ्यांना गयावया करून फितूर करून घेतले होते.श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता देवकी वसुदेव यांना मुलगा झाला. ठरल्याप्रमाणे वसुदेवाने रातोरात गोकुळात नंदराजाकडे जाऊन आपल्या मुलाला सांभाळण्याची आणि पालणपोषणाची विनंती केली.नंदराजा आणि यशोदामैया यांनी ही विनंती मान्य करून पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली.
नंदराजाच्या छायाछत्राखाली, यशोदेच्या ममतेखाली आणि गोपाळांच्या सहवासात बाळकृष्ण गोकुळात वाढू लागला.कर्णोपकर्णी ही बातमी कंसाला समजली.त्याने बालकृष्णाला मारण्यासाठी खूप पुतना मावशीसारखे खूप मारेकरी घातले;पण यांतून कृष्ण सहिसलामत वाचला.कृष्णाच्या बाललीला खूप प्रसिद्ध आहेत.पण त्यांतील बऱ्याच बाललीला कृष्णाची विटंबना करण्यासाठीच कृष्णचरित्रात घुसवल्या आहेत.यमुनातीरी अंघोळीला गेलेल्या गोपिकांची वस्रे लपवून ठेवल्याची कथा अगदी चघळून चघळून सांगितली जाते.आज कलियुगात भारतातील कोणत्याही नदीकिनारी तरूणी नदीकाठी वस्रे ठेवून विवस्त्र अवस्थेत अंघोळीला जात असल्याचे कुठेही ऐकिवात नाही;मग द्वापारयुगात हे कसे शक्य आहे..?तीच गोष्ट मथुरेच्या बाजाराला जाणाऱ्या गवळणींना अडवणारा श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी...ही कथा तर अनेक नाटकांत, तमाशात अगदी रंगवून रंगवून सांगितली जाते.इ स बाराव्या शतकापासून राधा हे पात्र आणि मथुरेच्या बाजारातील गवळणी अस्तित्वात आल्या आहेत.अवैदिक परंपरेतील एका महान तत्त्ववेत्त्याचे चारित्र्यहनन करण्याचाच हा घाट आहे.
मुळात श्रीकृष्णाकडे लहानपणापासूनच एक सद्सद्विवेकबुद्धी होती.त्याने इंद्राला (ऐतोबा)जाणारा नैवेद्य रोखला आणि तो नैवेद्य आपल्या गोरगरीब सवंगड्याला खायला दिला.कृष्णाच्या या कृत्यामुळे वैदिकांचा जळफळाट झाला होता.त्यांनी विरोधही केला होता; पण कृष्ण आणि त्याच्या सवंगड्यानी हा विरोध मोडून काढला.इंद्राचा नैवेद्य कायमचा बंद केला.
राधा आणि कृष्ण यांच्या सुरसकथांचा तर ऊतच आला आहे.अलीकडच्या टीव्हीवरील मालिकांमध्ये तर अशा कथांचे पेव फुटले आहे.द्वापार युगात आणि तदनंतर जे वेद, उपनिषदे, ब्राह्मणके किंवा इतर साहित्य निर्माण झाले होते,त्यांत कुठेही राधेचा उल्लेख आलेला नाही.राधा हे जाणीवपूर्वक कृष्णाला चिकटलेले पात्र आहे. रुक्मिणी, सत्यभामा,जांबुवंती अशा दहा बायका श्रीकृष्णाला होत्या याचा उल्लेख अनेक ग्रंथात आला आहे.मग प्रिय राधेलाच त्याने का नाकारलं..? एवढा साधा विचारही आपण करत नाही..
अशीच एक कथा कृष्ण-सुदामा यांची आहे.श्रीकृष्ण आणि सुदामा हे दोघे जिवलग मित्र होते.त्यांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते.त्यांच्या निखळ मैत्रीतही मिठाचा खडा टाकण्याचे काम वैदिकांनी केले आहे.सुदामा जेव्हा ऐश्वर्यसंपन्न आणि बलवान अशा आपल्या मित्राला-श्रीकृष्णाला भेटायला गेला, तेव्हा त्याचे स्वागत गळाभेट घेऊन, धुमधडाक्यात केले असेल,यात वादच नाही;पण सुदामा हा केवळ ब्राह्मण मित्र आहे म्हणून त्याचे पाद्यपूजन करून स्वागत केल्याचे चित्र रंगवले जाते, यांमध्ये निश्चितच कपट कारस्थान आहे.राजा कितीही मोठा असला, कितीही तत्वज्ञ असला तरी त्याला क्षुद्र लेखण्याच्या वैदिक परंपरेचा कटू अनुभव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांना आला होता, हे सर्वांना ज्ञात आहेच.तेच कृष्णाच्याही बाबतीत झाले आहे.
श्रीकृष्णाच्या सोळा हजार स्त्रियांची कथाही अशीच काहीशी आहे.त्यावेळी नरकासूर या बलवान राजाने आपल्या बळाचा वापर करून सोळा हजार स्त्रियांना कैदी बनवले होते.श्रीकृष्णाने नरकासुराचा पराभव करून सोळा हजार स्त्रियांची सुटका केली. सुटका केली खरी,पण बदनामीचे खापर घेऊन घरी परतण्यास या सर्व स्त्रियांनी नकार दिला.'घरी जा आणि आम्ही श्रीकृष्णाला वरले आहे असे सांगा'. श्रीकृष्णाने दिलेला हा सल्ला चांगलाच उपयोगी पडला. केवळ श्रीकृष्णाच्या नावाचा उल्लेख करून सोळा हजार स्त्रिया आपापल्या घरी आनंदाने राहू लागल्या.हे केवळ श्रीकृष्णाची जनमाणसात असलेली प्रतिमा आणि लोकप्रियता यांमुळे शक्य झाले.पुढे कथाकारांनी हीच कथा सोळा हजार स्त्रियांशी लग्न करणारा श्रीकृष्ण अशी रंगवली.
गोकुळात असतानाच श्रीकृष्णाने कालिया या नागराजाचा पराभव केला.तो वारंवार गोकूळवर हल्ला करून गोकूळकरांना त्रास द्यायचा.म्हणून त्याला समज देऊन सोडून दिले.गोकुळात असतानाच श्रीकृष्णाने सुदर्शनचक्र या दिव्यास्त्राची स्वतः निर्मिती केली होती. हे चक्र श्रीकृष्णाशिवाय कुणालाही चालवता येत नव्हते.गोकूळ सोडल्यानंतर मथुरेला गेल्यावर आपल्याच बलाढ्य मामाचा वध श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राचा वापर करूनच केला होता.अगदी तरूण वयात एका अन्यायी आणि अत्याचारी राजाचा त्याने नाते गोते न पाहता वध केला. श्रीकृष्णाला कपटी, कारस्थानी(कृष्ण कारस्थानी) म्हटले जाते,पण येन केन प्रकारे अनयायाचा शेवट करायचा,हेच श्रीकृष्णाच्या तत्त्वज्ञानाचे सार होते.त्याने कोणताही यज्ञ केला नव्हता.यज्ञ संस्कृती ही इंद्रादी वैदिकांची होती.यज्ञ संस्कृती जपली असती, तर इंद्राचा नैवेद्य बंद केला असता का. गवळ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यामुळेच श्रीकृष्णाला गोवर्धन गिरीधरी म्हटले जाते.
श्रीकृष्णाची महाभारतात एण्ट्री झाली आणि त्याचे जनहितवादी तत्त्वज्ञान अधिकच उजळून निघाले.द्रौपदीचे वस्त्रहरण रोखणारा श्रीकृष्ण गोपिकांची वस्रे कशी काय लपवून ठेवील.अनेक लेखकांनी आपले मनोरथ लेखणीतून उतरलेले आहे,असेच म्हणावे लागेल.
महायुद्ध रोखले जावे म्हणून श्रीकृष्णाने स्वतः शिष्टाई केली होती;पण दुर्योधन आणि शकुनी मामा यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे युद्ध अटळ झाले.श्रीकृष्णाने धर्मासाठी युद्धाचा शंख वाजवला होता.. धर्मासाठी म्हणजे न्यायासाठी, सत्यासाठी आणि हक्कासाठी हे युद्ध होते.या युद्धात महाप्रलय झाला होता.धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी ते त्यावेळी आवश्यकच होते. श्रीकृष्णाबद्द्ल जितके लिहावे, तितकं थोडेच आहे. एका लेखातून श्रीकृष्ण समजणे अशक्य असले तरी,तो समजण्यासाठी नवी दृष्टी प्राप्त होईल अशी आशा आहे.
कालपरत्वे श्रीकृष्णाची लोकप्रियता पाहून वैदिकांनी श्रीकृष्णाला नारायण, विष्णूचा अवतार वगैरे वगैरे बरेच काही केले असले तरी, श्रीकृष्ण एक माणूस,एक तत्वज्ञानी म्हणून समजून घेणे आवश्यक आहे.
संभाजी पाटील, राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक, माजी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती राधानगरी
फोन 9049870674
अभ्यासपूर्ण लेख ,शंका रास्त वाटतात .
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteसुंदर आणि अप्रतिम !
ReplyDeleteसत्यम शिवम सुंदरम !
सत्यम्, शिवम्, सुंदरम्!
ReplyDeleteश्रीकृष्ण एक तत्त्वज्ञ, सर्वज्ञानी माणूस होता.तो कुणाचाही अवतार नव्हता.तो एक स्वतंत्र विचारणारी होता....ही विचारधारा रुजवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
ReplyDeleteलोकांना मनोरंजनात्मक कथाआवडतात. सत्य असत्याचा कुणी ध्यासच घेतलेला नाही. आपण लिहीत असलेल्या या धाडसी लेखनाबद्दल आपल्याला धन्यवाद द्यावे तितके थोडीच. आप लिखते रहो हम पढते रहेंगे....
ReplyDeleteधन्यवाद. वाचक मोजकेच असावेत;पण चोखंदळ असावेत. त्यांच्यातीलच तुम्ही एक आहात.
ReplyDelete