वाघनख्या आणि राजकारण

             वाघनख्या आणि राजकारण

       छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे अनेक अंगांनी प्रेरणादायी असेच होते.सुमारे चारशे वर्षांपूर्वी राज्यसत्ता या धर्मभेदावर आधारित विभाजलेल्या नव्हत्या; तर प्रत्येक राज्यसत्ता आपली पारंपरिक गादी सांभाळण्यात, वाचवण्यात आणि वाढवण्यात गुंतलेली होती.अशा परिस्थितीत स्वबळावर नवीन राज्यसत्ता निर्माण करण्याची किमया छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली होती.अत्यंत कल्पक, दूरदृष्टीता असलेला,रयतेचे राज्य निर्माण करण्याच्या उद्देशाने ध्येयवेडा झालेला आणि महापराक्रमी असा हा राजा १६३० ते १६८० या कालावधीत होऊन गेला.

          छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र जसे विविध गुणांनी भरलेले आहे,तसे ते अस्सल पराक्रमाने भरभरून गेले आहे.त्यांतीलच एक सर्वत्र गाजत असलेला प्रसंग म्हणजे 'अफजलखानाचा वध'. महाराजांनी आपल्या एका पेक्षा एक अशा पराक्रमाने आणि गनिमी काव्याने अगदी तुटपुंज्या सैन्यांसह एका पाठोपाठ एक लढाया जिंकल्या होत्या.त्याचे हादरे विजापूरच्या आदिलशहाला बसत होते.म्हणूनच शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने बलाढ्य सैन्यांसह अफजलखानाला पाठवले होते.अफजलखानाने स्वतःहूनच चढे घोड्यानिशी शिवाजीला कैद करण्याचा विडा उचलला होता.आणि विशेष म्हणजे तो पूर्वी वाईचा सुभेदार होता. त्यामुळे त्याला वाई आणि जावळीच्या खोऱ्यातील इत्यंभूत माहिती होती.

         खान मराठी मुलखाचे नुकसान करतच आला होता, तरी सुद्धा उघड्या मैदानावर खानाचा पराभव करणे शक्य नसल्याने शिवरायांनी आपला मुक्काम प्रतापगडावर हलवून खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावण्याची रणनीती आखली गेली आणि घडलेही तसेच.....

         प्रत्यक्ष खान आणि शिवाजी यांच्या भेटीबाबत दोन्ही बाजूने सावध पवित्रा घेतला जात होता.कारण खानाना शहाजीराजांच्या ज्येष्ठ पुत्राला-संभाजीला एक लढाईत कपटाने ठार केले होते. म्हणून शिवराय सावध होते.खानाला आपल्या शक्तीचा आणि बळाचा गर्व असला तरी शिवरायांचा पराक्रम त्याच्याही कानावर गेला होता, त्यामुळे तोही सावध होता.भेटीच्या वेळी खानाने कट्यारीचा वार करताच शिवरायांनी वाघनख्यांनी खानाचा कोथळा काढला.आणि खान मारला गेला.तेव्हापासून वाघनख्या इतिहासात प्रसिद्ध झाल्या.

        शिवकाळात म्हणजे मध्ययुगीन काळात जेव्हा दोन योद्ध्यांमध्ये हातघाईची,झटापटीची लढाई व्हायची तेव्हा वाघनख्या, कट्यार,बिचवा यांचा वापर व्हायचा. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वाघनख्या वापरून शिवरायांनी खानाचा कोथळा बाहेर काढला, त्या वाघनख्या गेल्या कुठं? शिवरायांचे बत्तीस मण सोन्याचे सिंहासन गेले कुठे? हे आणि असे काही प्रश्न इतिहासात अनुत्तरित आहेत.भविष्यात सखोल अभ्यासांती काही प्रश्नांची उत्तरे मिळतील सुद्धा.

         आता कळीचा मुद्दा हा आहे की लंडनमधील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये ज्या वाघनख्या आहेत, त्या शिवरायांच्या का? शिवरायांच्याच असतील तर त्याच वाघनख्यांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता का? याला काही ऐतिहासिक कागदपत्रांचा ठोस पुरावा आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे ठोस मिळत नाहीत, असे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे. अर्थात शिवरायांनी अफझलखानाशी झालेल्या झटापटीच्या वेळी ज्या वाघनख्या वापरल्या होत्या, त्या मिळाल्या तर तमाम महाराष्ट्रातील लोकांच्या दृष्टीने ही बाब अभिमानास्पद आणि आनंदाची आहे.अल्बर्ट म्युझिअयचा सुद्धा तसा दावा नाही.इंग्रज राजवटीत सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांनी आपल्याजवळील एक वाघनख सातारचे तत्कालीन इंग्रज अधिकारी यांना भेट दिले होते.महाराष्ट्रात अनेक राजघराणी आहेत आणि त्यांच्याकडे आजही युद्धाच्या शस्त्रास्त्रांबरोबरच वाघनख्या सुद्धा आहेत. आता मुद्दा असा आहे की लंडनमधील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये  वाघनख्या आहेत, म्हणून त्या शिवरायांनी वापरलेल्या आहेत,असा निष्कर्ष काढणे म्हणजे बाळबोधपणाचे लक्षण आहे.

        सध्या महाराष्ट्रात जो वाघनख्यांचा खटाटोप चालला आहे,तो केवळ मतांच्या जोगव्यासाठीच हे उघड आहे..पण इतिहासकालीन घटनांचा असा चुकीचा वापर करणे हे घटनाबाह्य आहे.मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले ते 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' होते. शिवरायांचे अनेक गुप्तहेर, अंगरक्षक, वकील सर्व जातिधर्माचे होते.म्हणजे सर्व धर्म समभाव हा मंत्र शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी अंमलात आणला होता.शिवरायांच्या कार्याला आणि प्रतिमेला खुजे करण्याचे उद्योग काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. वरवर पाहता या लोकांना शिवरायांच्या बद्दल खूप कळवळा आहे असे वाटते, पण यांच्या पोटात वेगळेच आहे.  महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने शिवरायाचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी अशा कुटिल लोकांचे अनुयायी होण्यापेक्षा विवेकशील व्हावे.लोकाच्या भावनांशी खेळण्याचा कुणालाही अधिकार नाही....

       जय शिवराय, जय शंभूराजे,जय जिजाऊ.


शब्दांकन: संभाजी पाटील राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक , शिक्षक बॅंक तज्ज्ञ संचालक माजी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती राधानगरी .










Comments

Post a Comment

Popular posts from this blog

तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

शर्ट पँट घातलेली मुलांची दुसरी आई

श्रीकृष्ण जन्माष्टमी